सार
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांनी SIT चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी महेश विघ्ने यांच्या SIT मधील सहभागावर आक्षेप घेत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दमानिया यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुगेसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणीसह संबंधित आरोपींवर ठपका ठेवण्यात आल्याने पोलिसांनी वाल्मिक कराडला अटक केली आहे. याप्रकरणी सीआयडी आणि एसआयटी तपास करत असून, या तपासावर समाजसेविका अंजली दमानियांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर तपासावर तीव्र आक्षेप घेत, "संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मध्ये महेश विघ्ने कसे?" असा सवाल उपस्थित केला. बीड जिल्ह्यातील पोलिसांना एसआयटीमध्ये सामील करण्यात आले तर ते कसे निष्पक्ष चौकशी करू शकतील? असाही प्रश्न त्यांनी विचारला. दमानिया यांच्या मते, बीडच्या काही अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात संबंधित व्यक्तीला 'नमस्कार' केला असल्याचा आरोप केला. यावरून त्यांनी निष्पक्ष तपासासाठी बाहेरून अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे.
अंजली दमानिया यांनी सरकारवर आरोप केला आहे की, "एसआयटीच्या नावाखाली धुळफेक केली जात आहे." त्यांनी महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर शेअर करत, या प्रकरणाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले.
याशिवाय, दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील प्रशासनावर शंका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यात एका जातीच्या अधिकार्यांची नियुक्ती होण्यावर टीका केली आणि पंकजा मुंडे तसेच धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. त्यांच्या मते, या प्रकरणात राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे.
अंजली दमानिया यांना अनेक धमकीचे फोन
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड जिल्ह्यातून अनेक धमकीचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र सांगळे आणि इतर काही लोकांच्या नावांचा उल्लेख करत, त्यांनी धमक्यांचे आरोप केले. सोशल मीडियावर दमानिया यांचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित करत अश्लील पोस्ट टाकण्याचा आरोप त्यांनी केला. दमानिया यांच्या मते, हे सर्व धमक्यांचे कृत्य पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहेत.
अंजली दमानिया यांच्या या आरोपांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले आहे. या प्रकरणावर अधिक तपास होण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले जात आहे.