सार

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, दिल्लीतील राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेत तपास पथक पाठवले आहे. बदलापूरमध्ये हिंसक आंदोलन झाले असून, पोलिसांनी अश्रुधूर वापरून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

बदलापूर येथील दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना दिसून आले आहे. बदलापूरमध्ये या घटनेला हिंसक वळण लागले असून जमावाने रेल्वे स्टेशनवर दगडफेक केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दुसरीकडे या संतापजनक घटनेचे पडसाद राजधानी दिल्लीत देखील उमटतांना दिसत आहेत. राष्ट्रीय बालक आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोग एक पथक बदलापूरला पाठवणार आहे. एकूणच या संपूर्ण संतापजनक घटनेचे पडसाद आता दिल्लीत देखील उमटताना दिसत आहेत.

राष्ट्रीय बालहक्क आयोग करणार चौकशी

केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. यासाठी स्वतः आयोग एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पोक्सो सारख्या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद होणे हे फार महत्त्वाचे असते. असे असताना बदलापूरच्या प्रकरणात पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले आहे. या प्रकरणाची माहिती आम्ही घेतली असून राष्ट्रीय बाल आयोगाकडून एक पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बदलापूर येथे पाठवण्यात येईल. हे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. राज्य शासनाने देखील यावर कारवाई केली असून काही अधिकाऱ्यांची बदली देखील तिथून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेचा आम्ही स्वागत करतोय. मात्र या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याची माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.

बदलापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरुप

बदलापूर स्थानकात काहीवेळ दगडफेक झाल्यानंतर आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर ठिय्या देऊन बसले आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनाचे लोण शहरभर पसरले आहे. मंगळवारी सकाळीच बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र बदलापूर स्थानकातील आंदोलन तापल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस पथकाकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रुट मार्च काढला जात आहे. आंदोलनाचे लोण आणखी पसरु नये, यासाठी बदलापूरमध्ये मोठ्याप्रमाणावर पोलीस फौजफाटा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूर शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

आणखी वाचा :

बदलापूर शाळेत लैंगिक अत्याचार, पालकांचा संताप; बदलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद