भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील बोरगाव येथे मतदारांना इशारा दिला आहे की जर त्यांनी भाजपला मतदान केले नाही तर त्यांना निधी मिळणार नाही. लोणीकर यांनी मतदारांना 'फुली' मागितल्या आणि निधी दिला असल्याचे सांगितले.

जालना: "मी ५ वर्षांतून एकदाच तुमच्याकडे येतो तेही फुली मागायला! ती दिली नाही तर गावाला निधी फुलीच!" असं वक्तव्य करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी थेट मतदारांना इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील बोरगाव येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी गावकऱ्यांच्या मतदानावर नाराजी व्यक्त करत, भविष्यकाळात निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात असा संकेत दिला.

“८ कोटी रुपये दिलेत... तरीही मतांमध्ये मागे कसा?”

लोणीकर म्हणाले, "तुमचं गाव भाजपचं बालेकिल्ला होतं. ५०-६० टक्के मतदानाची अपेक्षा होती. म्हणूनच तुम्हाला ८ कोटींचा निधी देऊन ठेवला. पण मतदान झालं कमी. कुणी मशालीकडे, कुणी टीव्हीकडे गेलं... गाव पांगलं!" तसेच त्यांनी चक्क उपहास करत विचारले, "मी इतका निधी देतो आणि तरी बबनराव मागे कसा?"

कार्यकर्ते नाराज, गावाने 'धोका' दिला; खंत व्यक्त

बबनराव लोणीकर यांनी भाषणात पुढे सांगितलं की, "दिगंबरराव, खैरे, अशोकराव पंचायत समिती सगळेच नाराज आहेत. म्हणाले, 'गावाने धोका दिला.' मग विचारलं. निधी कॅन्सल करू का? पण म्हणाले, 'भाऊ, एवढं जाऊ द्या.'"

"एकदा चव पाहीन, तीनदा पाहीन, मग फुली मारेन!"

गावकऱ्यांना उद्देशून त्यांनी म्हटलं, "मी पहिल्यांदा फुली मागितली, दुसऱ्यांदा पैसे दिले, तिसऱ्यांदा ही वेळ आली तर म्हणेन फुली मारा. कारण शेवटी तुमच्याच गावात मी सभामंडप दिला, फिल्टर पाणी दिलं, डांबर रस्ते केले. डीपी जळाली की फोन माझ्याकडेच येतो."

"मला दिलंत नाही तरी मी देत राहीन, पण एक मर्यादा असते"

भाषणाच्या शेवटी लोणीकर म्हणाले, "मी ३३० गावांना डांबर रस्ते दिले, ज्या वेळेस ही ४४ गावं माझ्या मतदारसंघात आली तेव्हाच विकास दिला. तुम्ही मतं दिलीत की नाही, हे वेगळं. पण मी देत राहीन. मात्र एक मर्यादा असते. एकदा, दोनदा, तीनदा निधी देईन... त्यानंतर फुली मारेन. ही वेळ येऊ देऊ नका!"

विरोधकांकडून टीकेची शक्यता

या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांकडून या भाषणावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. मतदान हे अधिकार असून त्यासाठी दबाव टाकणं हा लोकशाहीचा अपमान आहे, असा सूर टीकाकारांमध्ये उमटू शकतो.

निधी म्हणजे 'फुलीचं बक्षीस'?

राजकीय प्रतिनिधी मतदारांना फक्त निवडणुकीपुरते आठवतात का? निधी हे विकासासाठी असतं की निवडणुकीच्या बदल्यातच मिळणारं राजकीय बक्षीस? बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे हे प्रश्न पुन्हा समोर आले आहेत.