मुंबईतील शासकीय जे. जे. रुग्णालयातील एका डॉक्टरने अटल सेतूवरुन उडी मारत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आईला फोन केला होता.
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्वाच्या अटल सेतूवर आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जे.जे. रुग्णालयातील एका 32 वर्षीय डॉक्टरने सोमवारी रात्री गाडी थांबवून खाडीत उडी घेत आपले जीवन संपवले. ही आत्महत्या इतकी अचानक आणि शांतपणे घडली की, तो काही वेळातच जेवणासाठी घरी येतो असे आईला सांगून डॉक्टर कायमचे निघून गेले.
अटल सेतूवरून खाडीत उडी मारली
सोमवारी रात्री अटल सेतूवर एक होंडा अमेझ कार अचानक थांबवण्यात आली आणि काही क्षणांतच एक व्यक्ती खाडीत उडी मारताना एका साक्षीदाराने पाहिलं. त्याने त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी तपास केला असता पुलावर एक कार आणि आयफोन आढळला.
पुलावर सापडलेल्या वस्तूंच्या आधारे ओंकार भागवत कवितके (वय 32) या डॉक्टरची ओळख पटली. ओंकार हे जे.जे. रुग्णालयात डॉक्टर पदावर कार्यरत होते आणि कळंबोली येथे राहत होते. त्यांचे मोबाईल आणि गाडी पुलावर असल्याने पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. ध्रुवतारा बोटीद्वारे खाडीत शोध घेण्यात येत आहे.
आईला शेवटचा कॉल
ही घटना अधिक हृदयद्रावक ठरली कारण आत्महत्या करण्याच्या काही क्षणांपूर्वी, रात्री ९.११ वाजता ओंकार यांनी त्यांच्या आईला फोन करून सांगितले होते की ते लवकरच जेवणासाठी घरी येत आहेत. हीच संवादाची अखेर ठरली. यावरून त्यांची मानसिक अवस्था काय होती, हे पोलिस तपासात समजण्याचा प्रयत्न करत आहेत.
अटल सेतू आत्महत्यांसाठी ‘हॉटस्पॉट’?
या प्रकरणामुळे अटल सेतू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पुलावरून आत्महत्या करण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि प्रशासनाने याबाबत कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी होत आहे.या घटनेचा पोलीस तपास सुरू असून, आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओंकार कवितके यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
कॉलेज तरुणीची आत्महत्या
मे महिन्यात एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने अटल सेतूवरून खाडीत उडी मारून जीवन संपवले. ती वाशीच्या दिशेने येत होती. तिच्या स्कूटीतून एक चिठ्ठी सापडली होती, ज्यामध्ये तिने वैयक्तिक मानसिक तणाव व नैराश्य व्यक्त केले होते. स्थानिक मच्छीमारांनी तिचे शव काही तासांत शोधून काढले.
नोकरीवरील तणावातून तरुणाची उडी
मार्च महिन्यात एका IT कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने अटल सेतूवरून उडी घेतली. त्याने सोशल मीडियावर आत्महत्येपूर्वी पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये नोकरीतील दबाव, कामाचा अपार ताण आणि वैयक्तिक संघर्ष याचा उल्लेख होता. त्याच्या मित्राने पोस्ट पाहून पोलिसांना कळवले होते, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


