- Home
- Maharashtra
- Aapli St App: बस अजून आली नाही? रेल्वेसारखी सुविधा हवीय?, आता एसटी Live ट्रॅक करा 'आपली एसटी' अॅपवर!
Aapli St App: बस अजून आली नाही? रेल्वेसारखी सुविधा हवीय?, आता एसटी Live ट्रॅक करा 'आपली एसटी' अॅपवर!
Aapli St App: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 'आपली एसटी' हे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. या ॲपमुळे प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचे रिअल-टाईम लोकेशन, सुटण्याची आणि पोहोचण्याची अचूक वेळ पाहता येणार आहे.

आता एसटीही ट्रॅक करा रेल्वेसारखी!
Aapli St App: महाराष्ट्रातील जिल्हा स्तरावर एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. जसं आपण रेल्वे ट्रॅक करू शकतो, तसंच आता एसटी बस सुद्धा रिअल टाईममध्ये ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे "बस आली का?", "कधी येणार?" अशा प्रश्नांपासून सुटका मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) ‘आपली एसटी’ हे नावीन्यपूर्ण मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे. या अॅपच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या जवळच्या बसस्थानकावर येणाऱ्या बसचं नेमकं स्थान, सुटण्याची वेळ, आणि आगमनाचा अंदाज वेळ पाहता येणार आहे.
‘आपली एसटी’ ॲपची वैशिष्ट्ये
जवळील बसस्थानकांची रिअल टाइम माहिती
बस सुटण्याची व पोहोचण्याची अचूक वेळ
एक लाखाहून अधिक मार्ग आणि १२,००० बसची माहिती
Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
सुरुवातीला ‘MSRTC Commuter’ या नावाने उपलब्ध; लवकरच नाव बदलून ‘आपली एसटी’ होणार
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ कंपनीच्या सहकार्याने विकसित झालेल्या या अॅपमुळे प्रवास अधिक सुगम, सुरक्षित आणि वेळेवर होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.
थांबा कमी, प्रवास जास्त
आतापर्यंत अनेक प्रवाशांना बस वेळेवर न आल्याने तासंतास थांबावं लागायचं. पण आता हे चित्र बदलणार आहे. कारण मोबाईलमधील ‘आपली एसटी’ अॅपद्वारे तुम्ही हवी ती बस ट्रॅक करू शकता आणि फक्त गरजेच्या वेळेसच थांब्यावर पोहोचू शकता. यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.
सुरुवातीचे तांत्रिक प्रश्न?
नवीन अॅप असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. याबाबत प्रवाशांनी सहकार्य करावं आणि अडचणी अॅपमार्फत किंवा हेल्पलाइनवर कळवाव्यात, असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. महामंडळ तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी सज्ज आहे.
एसटीचा प्रवास, आता डिजिटल वळणावर
‘आपली एसटी’ अॅपमुळे एसटीचा पारंपरिक प्रवास आता डिजिटल वळणावर जातो आहे. सुरक्षित, नियोजित आणि वेळेवर होणाऱ्या प्रवासामुळे एसटी सेवेला नवसंजीवनी मिळणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत.

