दारू पिणं आरोग्यासाठी वाईट आहेच, पण त्यासोबत चुकीचा चखणा खाल्ल्यास त्रास आणखी वाढतो. चवीसाठी किंवा 'किक' वाढेल म्हणून काहीही खाऊ नका. हे ५ पदार्थ टाळलेलेच बरे.

दारू पिताना सोबत काहीतरी 'चखणा' लागतोच. चिकन फ्राय, कबाब, चिप्स, लोणचं किंवा शेंगदाणे हे तर एकदम पॉप्युलर कॉम्बिनेशन आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दारू आरोग्यासाठी घातक आहे आणि त्यासोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर ते आरोग्याचं नुकसान आणखी वाढवतात. त्यामुळे दारू पिताना तुम्ही कोणता चखणा निवडता याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ दारूसोबत खाऊ नयेत.

तळलेले पदार्थ

फ्रेंच फ्राईज, पकोडे, चिकन फ्राय, चिकन कबाब यांसारखे तेलकट आणि तळलेले पदार्थ दारूसोबत खाणं टाळा. कारण दारू आणि तळलेले पदार्थ एकत्र पोटात गेल्यावर पोटाच्या आतल्या भागाला सूज येऊ शकते. यामुळे ॲसिड रिफ्लेक्स, छातीत जळजळ आणि मळमळ होण्यासारख्या समस्या सुरू होतात.

जास्त मीठ असलेले पदार्थ

खारे शेंगदाणे, चिप्स, तळलेले स्नॅक्स यांसारखे जास्त मीठ असलेले पदार्थ अनेकांना दारूसोबत खायला आवडतात. पण दारूमुळे शरीरातील पाणी कमी होतं, ज्याला डिहायड्रेशन म्हणतात. अशावेळी खारट पदार्थ खाल्ल्यास शरीरातील सोडिअमची पातळी वाढते आणि हाय ब्लड प्रेशरचा (BP) धोका निर्माण होतो.

दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रोडक्ट्स)

चीज, पनीर किंवा बटर वापरून बनवलेले पदार्थ दारूसोबत खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो. यामुळे पोट फुगल्यासारखं वाटणं, गॅस होणं अशा समस्या उद्भवतात. हे कॉम्बिनेशन भविष्यात आरोग्याच्या मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतं.

गोड पदार्थ

अनेकांना वाटतं की दारूसोबत गोड खाल्ल्याने 'किक' जास्त बसते, पण हे खूप धोकादायक आहे. दारू आणि साखरेचं मिश्रण रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवतं. यामुळे लिव्हरवरचा ताण वाढतो. इतकंच नाही, तर यामुळे दुसऱ्या दिवशीचा हँगओव्हर खूप जास्त त्रासदायक ठरतो.

चॉकलेट

दारूसोबत किंवा दारू प्यायल्यानंतर चॉकलेट खाणं चांगलं नाही. चॉकलेटमध्ये असलेलं कॅफीन, कोको आणि फॅट्स पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या वाढू शकतात.

विशेष सूचना: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. आरोग्याची काळजी आणि संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देण्यासाठी हा लेख आहे.