Weather Update : देशभरातील हवामानात बदल होताना दिसत असताना नव्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ सक्रिय असलेले हे वादळ पुढील 24-48 तासांत भारतात धडकण्याची शक्यता आहे. 

Weather Update : राज्यासह देशभरात हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमानात घट जाणवत असतानाच आता तयार झालेल्या नव्या चक्रीवादळामुळे वातावरणात आणखी उलथापालथ होणार आहे. दक्षिण भारत किनारपट्टीलगत पाहिल्या जाणाऱ्या या हवामान बदलाचा परिणाम देशभरात जाणवणार असून हवामान विभागाकडून यादरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. थंडी, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस अशी तिहेरी परिस्थिती आगामी दिवसांत अनुभवायला मिळू शकते.

चक्रीवादळामुळे पुन्हा वातावरणात बदल

राज्यासह देशातील वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गारठा जाणवत असताना आता मोठ्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाचा प्रभाव पुढील काही तासांत ठळकपणे जाणवेल. सध्या हे वादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि बंगालच्या उपसागराच्या लगत आहे. पुढील 24 ते 48 तासांत ते भारतीय किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दक्षिण राज्यांवर वादळाचा मोठा प्रभाव

या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांवर होण्याची शक्यता आहे. 29 ते 30 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्याचप्रमाणे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आंध्र प्रदेश आणि रायलसीमा पट्ट्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेगही वाढणार असल्याने जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

महाराष्ट्रात पुन्हा गारठा आणि हलका पाऊस

देशातील काही भागात पावसाचा इशारा असला तरी महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे. 2 ते 3 डिसेंबरपर्यंत राज्यभर गारठा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून तापमानात घट जाणवू लागली आहे. 28 नोव्हेंबर रोजी भंडाऱ्यात राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 10 अंश तापमानाची नोंद झाली. चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यातील पूर्व भागांवर होणार असून, विदर्भात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.

वादळाची सद्यस्थिती आणि पुढील हालचाल

हवामान खात्याच्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या किनारपट्टी आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले हे चक्रीवादळ गेल्या सहा तासांत 4 किमी प्रतीतास वेगाने उत्तर–वायव्य दिशेने सरकत आहे. 28 नोव्हेंबर दुपारी हे वादळ श्रीलंकेतील त्रिंकोमालीपासून सुमारे 30 किमी नैऋत्येस होते. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांना पुढील 48 तास सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. तर उत्तर भारतातही तापमानात मोठी घट होऊन तीव्र थंडी जाणवत आहे.