Edible oil price hike : इराण आणि इस्राइल यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

Edible oil price hike : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर दिसू लागला आहे. Iran-Israel तणावामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा फटका थेट भारतीय स्वयंपाकघराला बसत आहे. खाद्यतेलाच्या किमती अवघ्या काही दिवसांतच प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी वाढल्या असून, सणासुदीच्या तोंडावर ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी मोठी चिंता ठरत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ

  • बाजारात विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
  • पाम तेल: 120 वरून 135 रुपये प्रति लिटर
  • सूर्यफूल तेल: 140 वरून 155 रुपये प्रति लिटर
  • शेंगदाणा तेल: 180 वरून 190 रुपये प्रति लिटर

याशिवाय डालडा आणि सुगंधी तेलाचे दरही सुमारे 10 रुपयांनी वाढले आहेत. तसेच फ्राय नूडल्स, सेव यांसारख्या पदार्थांच्या किमतीतही प्रति किलो 5 रुपयांची वाढ झाली आहे.

घाऊक बाजारातही दरवाढ

घाऊक बाजारातही तेलाच्या किमती वाढल्याचे दिसून येत आहे. सूर्यफूल तेल 160 रुपयांवरून 173 रुपयांच्या पुढे गेले आहे. सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाची मागणी वाढली असून त्याचेही दर वाढले आहेत. मार्केट यार्डात 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. बाहेरील राज्यांतून होणारी आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात 10 ते 12 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे.

गुढीपाडवा होणार महाग

खाद्यतेलाबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होत असल्याने यंदाचा गुढीपाडवा अधिक महागडा ठरण्याची चिन्हे आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक ताण येणार आहे.

दरवाढीमागील कारणे काय?

1. जागतिक तणाव: इराण-इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून वाहतूक आणि लॉजिस्टिक खर्च वाढला आहे.

2. आयातीत अडथळे: बंदरांवरील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाची आयात कमी झाली आहे.

3. सणासुदीची मागणी: गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाची मागणी 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे.