हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचा एमक्यू-नाईन (MQ-9) लष्करी ड्रोन पाडल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) केला आहे. एका नव्या एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर करून हा ड्रोन नष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचा एमक्यू-नाईन (MQ-9) लष्करी ड्रोन अडवून पाडल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) केला आहे. त्यांच्या एरोस्पेस फोर्सने एका नव्या आणि अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर करून हा हल्ला केला. आयआरजीसीच्या एका निवेदनानुसार, इराणच्या सैन्याने नष्ट केलेला हा ५८ वा एमक्यू-नाईन ड्रोन आहे, असं प्रेस टीव्हीने सांगितलं आहे.
इराणच्या सैन्याचा दावा
आयआरजीसीने सांगितलं की, त्यांच्या एरोस्पेस फोर्सच्या एका आधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमने ड्रोनला लक्ष्य करून नष्ट केलं. पण ही घटना नेमकी कशी घडली, याबद्दल त्यांनी सविस्तर काहीही सांगितलेलं नाही. या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गावर करडी नजर ठेवली जाते, हे इराणच्या प्रशासनाने वारंवार स्पष्ट केलं आहे. देशाच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर दिलं जाईल.
US MQ9 काय आहे?
एमक्यू-नाईन रिपर हे मध्यम उंचीवर जास्त काळ उडू शकणारं एक मानवरहित हवाई वाहन (UAV) आहे. अमेरिकेचं सैन्य सहसा हेरगिरी, पाळत ठेवणे आणि ठराविक टार्गेट्सवर हल्ला करण्यासाठी याचा वापर करतं. तेहरान आणि वॉशिंग्टनमध्ये तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच हा दावा करण्यात आला आहे. नवा लष्करी संघर्ष झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणच्या अधिकाऱ्यांनी आधीच दिला आहे.
इराणचा इशारा
आयआरजीसीचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल होसेन मोहेब्बी यांनी गुरुवारी सांगितलं की, कोणत्याही लष्करी परिस्थितीसाठी इराण तयार आहे. पण दीर्घकाळ चालणारं युद्ध किंवा 'युद्धही नाही आणि शांतताही नाही'- अशी अनिश्चित परिस्थिती ते खपवून घेणार नाहीत.
प्रेस टीव्हीच्या रिपोर्टनुसार मोहेब्बी म्हणाले, "युद्धही नाही आणि शांतताही नाही, अशी परिस्थिती आम्ही मान्य करणार नाही." ते पुढे म्हणाले, एकतर रणांगणावरच सर्व निर्णय होईल, नाहीतर अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागतील.
इराणच्या शस्त्रास्त्रांबद्दल मोठा दावा
त्यांनी इराणच्या स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमच्या प्रगतीवरही प्रकाश टाकला. मोहेब्बी यांनी सांगितलं की, १२ दिवसांच्या युद्धानंतर देशाने किमान तीन नव्या डिफेन्स सिस्टिम तयार केल्या आहेत. ते म्हणाले, "नव्या डिफेन्स सिस्टिमचं डिझाइन आणि निर्मिती करण्यासाठी आमच्या आयआरजीसी एरोस्पेस फोर्सच्या सहकाऱ्यांनी दिवसरात्र एक करून काम केलं आहे. आनंदाची बातमी म्हणजे, आज आम्ही फक्त एक नाही, तर किमान तीन नव्या सिस्टिम तयार करू शकलो आहोत."
याआधी १५ नोव्हेंबर रोजी आयआरजीसीने दावा केला होता की, त्यांनी बहरीनच्या अल-रिफा हेलिकॉप्टर बेसवरील अमेरिकेच्या एका एअर डिफेन्स रडार सिस्टिमला लक्ष्य करून सहा ड्रोनने हल्ला केला. दुसरीकडे, संरक्षित सागरी क्षेत्रात नौदलाच्या खाणीला धडकून एका तेलाच्या टँकरला आग लागल्याची बातमी समोर आल्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव आणखी वाढला आहे. इराणच्या नौदलाने जहाजे चालवणाऱ्यांना या विशिष्ट संरक्षित क्षेत्रात प्रवेश न करण्याचा इशारा दिला आहे.
















