- Home
- India
- Books City : आपल्या देशात पुस्तकांचं शहर कोणतं? पाहा या शहरात सगळीकडे फक्त आणि फक्त पुस्तकंच!
Books City : आपल्या देशात पुस्तकांचं शहर कोणतं? पाहा या शहरात सगळीकडे फक्त आणि फक्त पुस्तकंच!
Books City: पुस्तकं वाचायला अनेकांना आवडतं. नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तकं खूप चांगला मार्ग आहे. आपल्या देशातील एका शहराची ओळख पुस्तकांची दुनिया अशीच आहे. तिथे तुम्हाला सगळीकडे फक्त पुस्तकांचीच दुकानं दिसतील.

आपल्या देशातील पुस्तकांचं शहर कोणतं?
आपल्यापैकी काहींना गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात, तर काहींना इतिहास, विज्ञान, कादंबऱ्या किंवा चरित्रे वाचायला आवडतात. सहसा आपण पुस्तकं विकत घेण्यासाठी बुक स्टोअरमध्ये जातो. पण आपल्या देशात एक असं शहर आहे, जे पुस्तकांसाठी विशेष ओळखलं जातं. इथे तुम्हाला रस्त्याच्या कडेला सगळीकडे फक्त आणि फक्त पुस्तकांचीच दुकानं दिसतील. जुन्या पुस्तकांपासून ते नव्या पुस्तकांपर्यंत, दुर्मिळ ग्रंथांपासून ते विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या पाठ्यपुस्तकांपर्यंत सर्व काही इथे उपलब्ध असतं. म्हणूनच या शहराला भारताचं पुस्तकांचं शहर असं म्हटलं जातं. ते शहर कोणतं आहे ते आपण इथे जाणून घेऊया.

कोलकात्यातील कॉलेज स्ट्रीट
पश्चिम बंगालमधील कोलकाता शहर पुस्तकं, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या शहराचं पुस्तकांशी एक अतूट नातं आहे. इथल्या लोकांमध्ये वाचनाची आवड पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संशोधक आणि पुस्तक प्रेमी पुस्तकांसाठी कॉलेज स्ट्रीट या भागात मोठ्या प्रमाणावर येतात.
कॉलेज स्ट्रीटचं वैशिष्ट्य काय?
कोलकात्यातील कॉलेज स्ट्रीट हे जगभरातील पुस्तक प्रेमींसाठी अत्यंत ओळखीचं ठिकाण आहे. सुमारे १.५ किलोमीटर लांब पसरलेल्या या रस्त्यावर तुम्हाला अनेक पुस्तकांची दुकानं, जुन्या पुस्तकांचे स्टॉल्स आणि प्रकाशन संस्था दिसतील. इथे नवीन पुस्तकांसोबतच जुनी पुस्तकंही कमी किमतीत मिळतात. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, साहित्यिक साहित्य, संशोधन ग्रंथ अशी अनेक प्रकारची पुस्तकं इथे उपलब्ध असतात. म्हणूनच ज्यांना पुस्तकं विकत घ्यायची आहेत त्यांच्यासाठी कॉलेज स्ट्रीट हे एका वेगळ्याच जगासारखं वाटतं.
जुन्या पुस्तकांनाही प्रचंड मागणी
साधारणपणे जुन्या पुस्तकांकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. पण कोलकात्यात मात्र जुन्या पुस्तकांनाही मोठी मागणी असते. विशेषतः विद्यार्थी, पुस्तक संग्राहक आणि संशोधक इथल्या जुन्या पुस्तकांच्या दुकानांना भेट देत असतात. जे लोक नवीन पुस्तकं खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत त्यांच्यासाठी जुनी पुस्तकं हा एक चांगला पर्याय असतो.
आणखी एका शहरालाही मिळाली विशेष ओळख
केरळमधील कोझिकोड शहराला २०२३ मध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये साहित्य विभागात स्थान मिळालं. यासोबतच कोझिकोड हे भारताचं पहिलं युनेस्को सिटी ऑफ लिटरेचर बनलं आहे. तिथेही अनेक वाचनालये आहेत आणि तिथे पुस्तक प्रदर्शने, साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
