भारताच्या 15 व्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे.
Vice President Election 2025 : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलैला संध्याकाळी रात्री अचानक प्रकृतीसंदर्भात काही कारणे देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. यामुळेच आता येत्या ९ सप्टेंबरला नव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. 74 वर्षीय धनखड यांनी ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०१७ पर्यंत होता. नव्या उपराष्ट्रपती पदासाठी संसदेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधकांचे उमेदवार माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी आमनेसामने आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक आवश्यक झाली आहे.
खासदारच ठरवणार उपराष्ट्रपती
राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूकही अप्रत्यक्ष मतदानाद्वारे होते. मात्र, फरक असा की उपराष्ट्रपतींची निवड फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार (निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य) करतात. प्रत्येक खासदाराचे मत समान एकच मूल्य असते. या प्रक्रियेवर निवडणूक आयोग संपूर्ण देखरेख ठेवतो.
मतदान कसे होते?
मतदान गुलाबी रंगाच्या मतपत्रिकांवर केले जाते. मतदार (खासदार) उमेदवारांना आपली पसंती क्रमाने दर्शवतात, म्हणजेच उमेदवारासमोर १, २, ३ अशा क्रमांकात मत देतात. यासाठी खास मतदान पॅनलचा पेन वापरावा लागतो. अन्य पेन वापरल्यास मतपत्रिका बाद ठरते.
विजयाचा ‘कोटा’ कसा ठरतो?
निवडणुकीत किती वैध मते पडली, त्याला दोनने भागून मिळालेल्या आकड्यात एकाची भर टाकली जाते. हा आकडा म्हणजे ‘विजयाचा कोटा’.उदाहरणार्थ, जर ७८० वैध मते पडली तर ७८०/२ = ३९० + १ = ३९१ इतकी मते मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित होतो.
मतमोजणीची प्रक्रिया
पहिल्या फेरीतच जर एखाद्या उमेदवाराला आवश्यक मते मिळाली तर तो थेट विजयी घोषित होतो. पण जर तसं झालं नाही, तर सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो आणि त्याची मते दुसऱ्या पसंतीनुसार इतर उमेदवारांना वाटली जातात. ही प्रक्रिया कोणी आवश्यक कोटा मिळेपर्यंत सुरू राहते.
उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ
निवडून आलेले उपराष्ट्रपती पदभार स्वीकारल्यापासून ५ वर्षे या पदावर राहतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळवणे हे केवळ प्रतिष्ठेचे नव्हे, तर संसदेतल्या समीकरणांसाठी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
भारताच्या उपराष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या काय असतात?
भारताचे उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद असून त्यांची मुख्य जबाबदारी राज्यसभेचे अध्यक्ष (Chairman of Rajya Sabha) म्हणून काम पाहणे ही आहे. राज्यसभेतील कामकाज सुरळीत पार पडावे, सभागृहातील शिस्त राखली जावी आणि चर्चा ठरलेल्या नियमांनुसार व्हावी यासाठी उपराष्ट्रपती महत्त्वाची भूमिका बजावतात. सभागृहात एखाद्या ठरावावर मतदान करताना मतांची संख्या समान असल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. याशिवाय, राष्ट्रपती अनुपस्थित, आजारी किंवा अपघातामुळे काम पाहू शकत नसल्यास उपराष्ट्रपती तात्पुरते राष्ट्रपतींची जबाबदारी सांभाळतात. उपराष्ट्रपती हे पक्षपातीपणा न करता तटस्थ भूमिकेतून राज्यसभेचे कामकाज चालवतात, तसेच संसद व कार्यकारी यंत्रणा यांच्यामध्ये सुसंवाद आणि समन्वय राखण्याचे कार्यही करतात. यामुळे ते भारतीय संसदीय लोकशाहीतील महत्त्वाचे शिलेदार मानले जातात.


