TVK Vijay Rally Stampede : गर्दीत लोकांना पकडून ढकलण्यात आले. विजय दुपारी येणार होते, पण ते रात्री आले. अनेक तास गर्दी तशीच होती. कोणीही नियंत्रण ठेवले नाही. अनेकांना प्यायला पाणीही मिळाले नाही.

TVK Vijay Rally Stampede : करूरमध्ये विजयच्या प्रचार सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ जणांचा मृत्यू झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. संपूर्ण करूर शहर दुःखात बुडाले आहे. ६ मुले, १७ महिलांसह ३९ जणांचे मृतदेहच आणण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चेंगराचेंगरीमुळे अनेकांना चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या निर्माण झाल्या. विजयचे चाहते मोठ्या संख्येने जमल्याने सुरक्षा व्यवस्था अपुरी पडल्याचा आरोप होत आहे.

तवेकचे अध्यक्ष विजय यांनी यापूर्वीच तमिळनाडू सरकारने जाणूनबुजून सभेसाठी छोटी जागा दिल्याचा आरोप केला होता. करूर सरकारी रुग्णालय आणि अतिदक्षता विभागात काही जणांवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.

या मृत्यूंना काय कारण आहे, याबद्दल सभेत उपस्थित असलेल्या एका तरुणीने सांगितले, ''विजय येणार होते, तर त्यांना पाहण्यासाठी आलेल्या लोकांना सुरक्षितपणे घरी पाठवायला हवे होते. गर्दीत श्वास घ्यायला त्रास झाल्याने अनेकजण त्रस्त होते. खूप लोक मरण पावले आहेत. आता विजय ते सर्व पाहायला येत आहेत का? ते काहीही न बोलता भाषण देऊन निघून गेले. गर्दीत लोकांना पकडून ढकलण्यात आले. विजय दुपारी येणार होते, पण ते रात्री आले. अनेक तास गर्दी तशीच होती. कोणीही नियंत्रण ठेवले नाही. अनेकांना प्यायला पाणीही मिळाले नाही.

स्टॅलिन यांचे उत्तम नियोजन

स्टॅलिन यांनीही त्रिवेणी उत्सव साजरा केला होता. त्यांनी किती चांगली सुरक्षा दिली होती. तवेकच्या लोकांनी कशाचीही पर्वा केली नाही. सगळ्यांना ढकलून दिले. आलेल्या लोकांना सुरक्षा द्यायला हवी होती,'' असे ती तरुणी संतापाने म्हणाली.

हजारो लोक जमले असतानाही पुरेसे बॅरिकेड्स, स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग नव्हते, असे म्हटले जात आहे. जास्त गर्दीमुळे जागेत हवा खेळती राहिली नाही आणि गुदमरण्याचे प्रकार वाढले. मोठ्या सभेमध्ये पाणीपुरवठा आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भाषण संपल्यानंतर लोक एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरी झाल्याचेही सांगितले जात आहे.

विजय यांनी जबाबदारी घ्यावी

या मृत्यूंची जबाबदारी विजय यांनी घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी योग्य प्रकारे प्रचारसभा आयोजित करायला हवी होती, असे आरोप त्यांच्यावर होत आहेत. यासाठी पोलीस आणि तवेकच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी. तवेकच्या सभांवर बंदी घालण्याची मागणीही होत आहे. तर अण्णाद्रमुकचे समर्थक "हे द्रमुकच्या राजवटीत घडत आहे" असा आरोप करत आहेत.

या घटनेचा तामिळनाडूच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. करूरजवळील जिल्ह्यांमधून डॉक्टरांना बोलावून उपचारांची व्यवस्था केली जात आहे.