भाजलेल्या चण्यांसह विविध अन्नपदार्थांमध्ये कर्करोगजन्य ऑरामाइन रंगाचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण पुढे आल्यानंतर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
भाजलेल्या चण्यांसह विविध अन्नपदार्थांमध्ये कर्करोगजन्य ऑरामाइन रंगाचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण पुढे आल्यानंतर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या धोकादायक रंगामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत आरोग्य मंत्रालयाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच FSSAI च्या कमजोर देखरेखीवर सवाल उपस्थित करत देशव्यापी तपासणी, कठोर अंमलबजावणी आणि सर्व प्रोटोकॉलचे ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हे प्रकरण खाद्यसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे.
भाजलेल्या चण्यांमध्ये कर्करोगजन्य रंगाची भेसळ
शिवसेना (यूबीटी)च्या माननीय खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजलेले चणे आणि इतर अन्नपदार्थांमध्ये कर्करोग निर्माण करणारा ऑरामाइन रंग वापरला जात असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. अलीकडील अहवालांनुसार, कापड आणि चामड्याच्या उद्योगात वापरला जाणारा हा घातक रंग अन्नपदार्थांमध्ये बेकायदेशीररित्या मिसळला जात असल्याचे उघड झाले आहे.
FSSAI वर चौकशी व देखरेखीबाबत खासदारांचा सवाल
प्रियंका चतुर्वेदी आपल्या पत्रात म्हणतात की ही भेसळ केवळ अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे उल्लंघन नाही, तर लाखो भारतीयांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. त्यांनी स्पष्टपणे FSSAI च्या नियामक यंत्रणेवर सवाल उपस्थित केला. WHO च्या मते ऑरामाइन हा संभाव्य कार्सिनोजेन असून यकृत, मूत्रपिंड, मूत्राशयाचा कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल हानीशीही त्याचा संबंध आहे. तरीही अशा बेकायदेशीर भेसळीवर योग्य कारवाई होत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.
बाजारपेठेतील कमकुवत देखरेख आणि अपुऱ्या चाचणीवर टीका
खासदार चतुर्वेदी यांनी नमूद केले की “बाजारातील देखरेख कमकुवत आहे, नियमित चाचण्या अपुऱ्या आहेत आणि ग्राहकांना सावध करण्यास उशीर केला जातो.” यामुळे या धोकादायक प्रथेला प्रोत्साहन मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. परवाना रद्द करणे, दंड, प्रयोगशाळा चाचण्या आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई यांसारख्या कठोर उपाययोजनांची त्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय आरोग्य इशारा व देशव्यापी तपासणीची मागणी
प्रियंका चतुर्वेदी यांनी मंत्रालयाला याबाबत राष्ट्रीय आरोग्य इशारा तातडीने जारी करण्याची विनंती केली आहे. देशभरात भाजलेले चणे आणि संबंधित खाद्यपदार्थांची तपासणी करून दूषित बॅचेस आणि त्यांचे स्रोत ओळखावे, अशी त्यांची मागणी आहे. राज्यांच्या आरोग्य विभागांनीही समांतर तपासणी सुरू करावी, असे त्या म्हणाल्या.
FSSAI प्रोटोकॉलचे अंतर्गत ऑडिट अनिवार्य—चतुर्वेदी
खासदार चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले की अन्नात कर्करोगजन्य रंगांचा वापर हा सार्वजनिक सुरक्षेवरील गंभीर आघात आहे. त्यामुळे FSSAI च्या प्रोटोकॉलचे अंतर्गत ऑडिट करून या त्रुटी कशा घडल्या याचा तपास करणे अत्यंत आवश्यक आहे. “ग्राहकांचा अन्न सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावी,” अशी त्यांची ठाम मागणी आहे.


