जगभरात दरवर्षी लाखो लोकांना कॅन्सर होतो. त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॅन्सरविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस रशियन शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.
मॉस्को : जगभरात दरवर्षी लाखो लोकांना कॅन्सर होतो. त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॅन्सरविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस रशियन शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. एआरएनए आधारित ही लस पूर्व चाचण्यांमध्ये १००% प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
रशिया सरकारने अद्याप या लसीला अंतिम मान्यता दिली नाही. मान्यता मिळाल्यास ही जगातील पहिली कॅन्सर लस असेल, असे म्हटले जात आहे.
‘एंटरोमिक्स’ नावाची ही लस पूर्व चाचण्यांमध्ये मोठ्या कॅन्सर गाठी असलेल्या रुग्णांवर वापरली गेली. यावेळी कॅन्सर नष्ट करून गाठीचा आकार कमी करण्यात लस यशस्वी झाली आहे, असे ही लस विकसित करणाऱ्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (एफएमबीए) ने म्हटले आहे.
एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून ही लस विकसित करण्यात आली आहे. याच पद्धतीने कोविड-१९ ची लसही विकसित करण्यात आली होती. तेव्हा कोविडसाठी कमकुवत विषाणू वापरून लस विकसित केली होती, तर इथे कॅन्सर पेशींविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणारे प्रथिने तयार करण्यासाठी आपल्या शरीराच्या पेशींना ही लस उत्तेजन देते.
३ वर्षे पूर्व चाचण्या
ही लस विकसित करणाऱ्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (एफएमबीए) च्या प्रमुख वेरोनिका स्कोवत्सोवा यांच्या मते, 'तीन वर्षांच्या पूर्व चाचण्यांसह अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ही लस विकसित करण्यात आली आहे. चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. काही प्रकरणांमध्ये कॅन्सर गाठींची वाढ ६०% ते ८०% नी कमी झाली आहे. हे कॅन्सरनुसार बदलते,’ असे त्यांनी सांगितले.
फुफ्फुस, स्तन, मोठे आतडे, स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांना या लसीचा जास्त फायदा होईल, असे म्हटले जात आहे.
- - ‘एंटरोमिक्स’ नावाची लस विकसित
- - कोविड-१९ लसीच्या धर्तीवर लस
- - पूर्व चाचण्यांमध्ये सुरक्षित असल्याचे सिद्ध
- - मान्यता मिळाल्यास जगातील पहिली कॅन्सर लस
- - एफएमबीएच्या प्रमुख वेरोनिका यांची घोषणा


