सार

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज आहे. प्रत्येकाचे लक्ष प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्ताकडे लागून राहिले आहे. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सुरुवात मंगल ध्वनीने होणार आहे.

Ram Mandir Pran Pratishtha :  अयोध्येत राम मंदिरात 16 जानेवारीपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. आज शुभ मुहूर्तावर रामललांची गभाऱ्यात स्थापना केली जाणार आहे. या सोहळ्याची सुरुवात मंगल ध्वनीने होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थिती लावणार आहेत. संपूर्ण दिवस धार्मिक अनुष्ठान पार पडणार आहे.

अयोध्येत आज असा असणार कार्यक्रम

  • आज सकाळी 8-9 दरम्यान मंत्रोच्चार करत रामललांचा श्रृंगार केला जाणार आहे. सकाळी 10 वाजता मंगल ध्वनी होणार आहे.
  • सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. यानंतर सकाळी 11 ते दुपारी 12 वाजून 55 मिनिटांदरम्यान सर्व पाहुणे येणार असून, गभाऱ्यात पूजा-प्रार्थना पार पडणार आहे.
  • दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदादरम्यान रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दुपारी 1 वाजता पंतप्रधान पाहुण्यांना संबोधित करणार आहेत.
  • दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुबेर टीला येथील शिव मंदिरात पूजा करणार आहेत.
  • दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मंदिर मंडपात वसोरधारा पूजन, शुक्ल यजुर्वेद, ऋग्वेद शाखा संबंधित होम व पारायण होणार आहे.

84 सेकंदाचा मुहूर्त महत्त्वाचा
अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदाचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. काशीतील ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वर शास्री द्रविड यांनी हा शुभ मुहूर्त काढला आहे. शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदादरम्यान असणार आहे. या शुभ मुहूर्तावरच रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

मंगल ध्वनीने होणार कार्यक्रमाची सुरुवात
आज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सुरुवात मंगल ध्वनीने होणार आहे. यासाठी देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून विशेष वाद्य मागवण्यात आले आहेत.

देश-विदेशातील पाहुणे लावणार प्राणप्रतिष्ठेला उपस्थिती
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी देश-विदेशातील काही विशेष पाहुणे उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये राजकरण ते उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय काही पाहुणे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या एक दिवस आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत.

आणखी वाचा : 

रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा

Weather Update : 22 जानेवारीला अयोध्येतील हवामानाचा IMDने वर्तवला अंदाज, जाणून घ्या सविस्तर

20 किलो Parle G बिस्किटांचा वापर करुन साकारण्यात आलेय राम मंदिर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल