Assembly Election 2026 Date: निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या घोषणेसोबतच या सर्व राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने रविवार, १५ मार्च रोजी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आसाम आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान होईल. तर, तामिळनाडूमध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान पार पडेल. सर्व राज्यांची मतमोजणी ४ मे रोजी एकाच वेळी होणार आहे. या घोषणेमुळे या राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही घोषणा केली. यावेळी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी हे देखील उपस्थित होते.
EVM मध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार
या ५ राज्यांमध्ये एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी २.१९ लाख मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी ४० हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तर, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. विशेष म्हणजे, यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये सर्व उमेदवारांचे रंगीत फोटो लावण्यात येणार आहेत. तसेच, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रं दिली जातील आणि प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सोय असेल.
५ राज्यांचं संपूर्ण निवडणूक वेळापत्रक
राज्य | जागा | टप्पे | मतदान कधी |
| पश्चिम बंगाल | २९४ | २ | २३ आणि २९ एप्रिल |
| तामिळनाडू | २३४ | १ | २३ एप्रिल |
| आसाम | १२६ | १ | ९ एप्रिल |
| केरळ | १४० | १ | ९ एप्रिल |
| पुद्दुचेरी | ३० | १ | ९ एप्रिल |
मे महिन्यात संपतोय पाचही विधानसभांचा कार्यकाळ
या पाचही राज्यांच्या सध्याच्या विधानसभांचा कार्यकाळ मे २०२६ मध्ये संपत आहे. त्यामुळे वेळेवर नवीन सरकार स्थापन करता यावं, यासाठी घटनात्मक प्रक्रियेनुसार वेळेवर निवडणुका घेणं आवश्यक आहे.
२०२१ मध्ये किती टप्प्यांत झालं होतं मतदान?
मागील वेळेचा विचार केल्यास, २०२१ मध्ये या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान झालं होतं, तर आसाममध्ये ३ टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान झालं होतं.
पश्चिम बंगालमध्ये TMC आणि भाजपमध्ये थेट लढत
पश्चिम बंगालच्या २९४ विधानसभा जागांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पश्चिम बंगालमधील सुमारे ६० लाख संशयित मतदारांच्या प्रकरणांची चौकशी सुरू ठेवणार आहे. न्यायालयाच्या मंजुरीनंतर पुरवणी मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. याशिवाय, राज्यातील सर्व २९४ विधानसभा जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
आसाममध्ये NDA आणि काँग्रेसमध्ये टक्कर
आसामच्या १२६ विधानसभा जागांसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य सामना पाहायला मिळू शकतो.
केरळमध्ये LDF आणि UDF आमनेसामने
केरळच्या १४० जागांसाठी मुख्य लढत लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) यांच्यात मानली जात आहे. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सुमारे १०० जागांवर निवडणूक लढवत आहे. उर्वरित ४० जागांवर त्यांचे मित्रपक्ष भारत धर्म जन सेना (BDJS) आणि Twenty20 Kizhakkambalam हे रिंगणात आहेत.
तामिळनाडूमध्ये जागावाटपाची लगबग
तामिळनाडूमध्ये राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला असून २३४ विधानसभा जागांसाठी जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. इथे काँग्रेस, DMK आणि CPI एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यांना AIADMK, भाजप आणि ऑल इंडिया एनआर काँग्रेस यांच्या आघाडीचं आव्हान आहे.
पुद्दुचेरीच्या सर्व जागांवर होणार मतदान
पुद्दुचेरीमध्ये एकूण ३० विधानसभा जागा असून, सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
तारखांच्या घोषणेसोबतच आदर्श आचारसंहिता लागू
निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच पाचही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) तात्काळ लागू झाली आहे. त्यामुळे आता सरकार आणि राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करावं लागेल.


