सार
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार असल्याने जय्यत तयारी केली जात आहे. सध्या मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. अशातच 17 जानेवारीला रामललांची मूर्ती मंदिरात आणण्यात आली.
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जात आहे. तत्पूर्वी मंदिरातील धार्मिक विधींना 16 जानेवारी पासूनच सुरुवात झाली आहे. बुधवारी ( 17 जानेवारी) रामललांची मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली आहे. याआधी रामललांची प्रतिकात्मक मूर्ती संपूर्ण परिसरात फिरवण्यात आली.
आज (18 जानेवारी) रामललांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन केली जाणार आहे. रामललांना विराजमान होण्यासाठी 3.4 फूट उंचीचे मकराना दगडापासून आसन तयार करण्यात आले आहे.
राम मंदिराचे बांधकाम पूर्ण
राम मंदिराच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी म्हटले की, राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रामललांच्या मंदिरातील गर्भगृहात पाच मंडप बनवण्यात आले आहेत. मंदिर तळमजल्यावर असून पहिल्या मजल्याचे थोडे काम करणे अद्याप शिल्लक आहे. येथे राम दरबार असणार आहे.
मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर अनुष्ठान असणार असून येथे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, हवन आणि अनुष्ठान केले जाणार आहे. येत्या 22 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे.
भाविकांसाठी स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार
भारतीय रेल्वेकडून अयोध्येसाठी 200 स्पेशल ट्रेन चालविल्या जाण्याचा विचार केला जात आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांनी होणारी गर्दी पाहता या स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत. याशिवाय गुरुवार (18 जानेवारी) पासून अयोध्येत 200 इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. याआधी ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष अनुष्ठान
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. याशिवाय पंतप्रधान सध्या 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानचे पालन करत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी देश-विदेशातील 7 हजार जणांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
आणखी वाचा :
घरबसल्या राम मंदिरातील आरतीसाठी लावता येईल उपस्थिती, ऑनलाइन पास मिळवण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
Ram Mandir Ceremony : दादर येथील शिवाजी पार्कात उभारलीय राम मंदिराची सुंदर प्रतिकृती, पाहा VIDEO