सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आले असता सर्वप्रथम त्यांनी काशी संसद संस्कृत स्पर्धेच्या पारितोषित वितरण समारंभाला उपस्थिती लावली. यानंतर अमूल बनास डेअरी प्लांटला भेट देण्यासह उद्घाटनही केले.
PM Modi Visit UP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (23 फेब्रुवारी) वाराणसी येथील काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पंतप्रधानांनी करखियांव येथील UPSIDA अॅग्रो पार्कातील बनासकांठा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ लिमिटेडच्या दूध प्रक्रिया युनिट बनास काशी संकुलला भेट दिली. यानंतर प्लांटचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करत म्हटले की, "10 वर्षांमध्ये बनारसने मला बनारसी बनवले आहे. याशिवाय तुम्हा सर्वांना ऐवढ्या मोठ्या संख्येने पाहून मन प्रसन्न झाले" अशी भावना मोदींनी व्यक्त केली. याशिवाय वाराणसीत 13 हजार कोटी रुपयांहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. पंतप्रधानांनी म्हटले की, "हे प्रकल्प काशीसह पूर्वांचल आणि पूर्व भारताच्या विकासाला गती देतील."
600 टन कचऱ्याचे 200 टन कोळश्यामध्ये रुपांतर केले जाणार
पंतप्रधानांनी म्हटले की, बनास काशी क्लस्टर रोजगारामुळे हजारो नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. आज येथे एका अशा प्लांटचे उद्घाटन केले आहे ज्याच्या माध्यमातून शहरातील 600 टन कचऱ्याचे 200 टन कोळश्यामध्ये रुपांतर केले जाणार आहे.
पंतप्रधानांना राहुल गांधींवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसचे युवराज म्हणतात उत्तर प्रदेशातील तरुण नशेच्या आहारी गेले आहेत. ही कोणत्या प्रकारची भाषा आहे. अशी लोक माझ्या काशीतील मुलांना नशेच्या आहारी गेलेले म्हणतात पण स्वत: तरी शुद्धीत असतात का? यांच्याकडून मोदींना शिव्याशाप देण्यातच दशक गेले, आता हेच येथील जनतेवर राग व्यक्त करत आहेत. पंतप्रधानांनी म्हटले की, "राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान केला असून येथील जनता हे कधीच विसरणार नाही."
दरम्यान, कार्यक्रमानिमित्त पंतप्रधानांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे. याशिवाय नागरिकांनी म्हटले की, "त्यांच्यासारखे काम आजवर उत्तर प्रदेशात कोणत्या नेत्याने केलेले नाही. त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही." यासंदर्भातच एका व्यक्तीने म्हटले की, “ते राम आहेत, ते एक अवतार आहेत.”
आणखी वाचा :