भारताचा स्टार नेमबाज नीरज कुमारने वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलं आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्याने कांस्यपदक मिळवलं. या यशासह पंजाबच्या २६ वर्षीय नेमबाजाने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी आपलं तिकीट पक्कं केलं आहे.

भारताचा स्टार नेमबाज नीरज कुमारने वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केली आहे. कतारमधील दोहा इथे झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात नीरजने कांस्यपदक खिशात घातलं. या पदकासह पंजाबच्या होशियारपूर येथील २६ वर्षीय नीरजने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत रशियाच्या दिमित्री एलेन पिमानोव्हने ३६२.८ गुणांचा ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्ड करत सुवर्णपदक जिंकलं.

काय म्हणाला नीरज?

दुसऱ्या स्थानावर राहत जॅनीने रौप्यपदक पटकावलं. विशेष म्हणजे, जॅनीने याआधीच १० मीटर एअर रायफल इव्हेंटमधून ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. त्यामुळे नियमानुसार कांस्यपदक जिंकणाऱ्या नीरजला हा मोलाचा ऑलिम्पिक कोटा मिळाला. टीम इव्हेंटमध्ये यश मिळवूनही नीरजला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक पदकाची प्रतीक्षा होती. अनेक फायनलमधून रिकाम्या हाताने परतल्यानंतर, या कांस्यपदकाने त्याची ही मोठी प्रतीक्षा संपवली. सामन्यानंतर भावुक होत नीरज म्हणाला, "मला खूप आनंद झाला आहे. याआधी अनेक फायनलमध्ये माझं पदक थोडक्यात हुकलं होतं. शेवटी ती मोठी प्रतीक्षा संपली. टीम इव्हेंटमध्ये पदक जिंकलं होतं, पण वैयक्तिक पदकाची खूप भूक होती. मला माहितीय की हे पदक जिंकताना टीव्हीवर पाहून माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला असेल. ज्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला, त्या सर्वांचा मी आभारी आहे."

ऑलिम्पिकचं तिकीट कन्फर्म

नीरज कुमारचा ५० मीटर रायफल ३ पोझिशन हा शूटिंगमधील सर्वात कठीण प्रकार मानला जातो. या फायनलमध्ये पिमानोव्हचा रेकॉर्डब्रेक खेळ आणि जॅनीच्या कामगिरीमुळे फायनलची रंगत आणखी वाढली. पण अशा दडपणाच्या वेळीही नीरजने ज्या प्रकारे आपलं लक्ष्य अचूक साधलं, ते पाहून अनुभवी नेमबाजही प्रभावित झाले. नीरजच्या या यशानंतर भारतातील शूटिंग क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे. रायफल प्रकारातील भारतीय नेमबाजांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ऑलिम्पिकमधील पदकाच्या आशा आणखी वाढल्या आहेत.