विमानाच्या इंधनाचे दर वाढल्याने इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे भाडे अचानक वाढवले आहे. देशांतर्गत उड्डाणांसाठी १३०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी १० हजार रुपयांपर्यंत इंधन अधिभार (Fuel Surcharge) वाढवण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात झालेली ही दरवाढ सामान्य प्रवाशांसाठी मोठा धक्का आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने (IndiGo) त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे तिकीट दर वाढवले आहेत. देशांतर्गत उड्डाणांच्या भाड्यात १०० ते ३५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ६ ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. विमानाच्या इंधनाच्या (ATF) दरात मोठी वाढ झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. देशांतर्गत उड्डाणांसाठी अंतराच्या आधारावर भाडेवाढ करण्यात आली आहे. ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ३७५ रुपये आणि ५०१ ते १००० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ६०० रुपये नवीन चार्ज आकारला जाणार आहे.
इंडिगोच्या विमान भाड्यात मोठी वाढ!
२००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या देशांतर्गत उड्डाणांसाठी आता १३०० रुपये इंधन अधिभार (Fuel Charge) द्यावा लागेल. यापूर्वी हे चार्जेस अनुक्रमे २७५, ४०० आणि ९५० रुपये होते. भारतात सध्या विमानाच्या इंधनाचा दर १३७ रुपये प्रति लिटर इतका आहे. ऑक्टोबर महिन्यातच इंधनाच्या दरात १६ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत सध्या विमान कंपन्यांना इंधनावर सर्वाधिक खर्च करावा लागत असल्याचं इंडिगोने सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बाबतीतही मार्ग आणि अंतराच्या आधारावर १००० ते १०,००० रुपयांपर्यंत भाडे वाढवण्यात आले आहे. सार्क (SAARC) देशांमध्ये ५०० किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या उड्डाणांसाठी ५०० रुपये आणि त्याहून अधिक अंतरासाठी १००० रुपये सरचार्ज लागेल.
प्रवासी आणि सामान्यांसाठी तिकिटाचे दर किती असतील?
मध्यपूर्व, जीसीसी (GCC) देश, आग्नेय आशिया आणि ईशान्य आशियामध्ये जाण्यासाठी ५५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. आफ्रिकन देशांसाठी हा चार्ज ६००० रुपये आहे. दुसरीकडे, युरोपसारख्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी सर्वाधिक म्हणजे १०,००० रुपये सरचार्ज जाहीर करण्यात आला आहे. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत विमानाच्या इंधनाचे दर १४ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. गेल्या दशकात एटीएफचे (ATF) दर आता जवळपास सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चाचा मोठा हिस्सा इंधनावर खर्च होतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कंपनीचा आर्थिक समतोल आणि दैनंदिन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नाईलाजाने हा सरचार्ज लादण्यात आल्याचं इंडिगो एअरलाइन्सने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. इंडिगोने भाडे वाढवल्यानंतर आता इतर विमान कंपन्याही लवकरच याच मार्गावर जाण्याची शक्यता आहे.
आणखी बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनेलवर लक्ष ठेवा, येथे क्लिक करा.


