मिरतमध्ये गाजलेल्या 'ब्लू ड्रम' हत्याकांडातील मृतक सौरभचा मोठा भाऊ राहुल उर्फ बबलू गाडीच्या धडकेत जखमी झालाय. दिल्ली रोडवर हा अपघात घडला आहे.

मुंबई : यूपीच्या मिरतमध्ये काही दिवसांपूर्वी गाजलेल्या 'ब्लू ड्रम' हत्याकांडात आता एक नवी मोड आली आहे. या प्रकरणातील मृतक सौरभचा मोठा भाऊ राहुल उर्फ बबलू हा एका कारच्या धडकेत गंभीर जखमी झालाय. हा अपघात नसून आपल्यावर झालेला थेट हल्ला आहे, असा गंभीर आरोप राहुलने केलाय. यामागे साहिल किंवा मुस्कानच्या घरच्यांचा हात असावा, असा संशयही त्याने व्यक्त केलाय. 'आज तक'च्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या आरोपांना अद्याप दुजोरा दिलेला नाही आणि घातपाताचा असा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मिरतच्या दिल्ली रोडवरील बहादूर मोटरजवळ ही घटना घडली. राहुल रस्त्याच्या कडेला उभा असताना एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली आणि चालक गाडीसह तिथून पसार झाला.

सौरभचा भाऊ रुग्णालयात दाखल

घटनेनंतर राहुलने तातडीने फोन करून आपल्या घरच्यांना आणि मित्रांना याबद्दल सांगितले. त्यांनी त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात राहुलच्या हाताला, पायाला आणि बरगड्यांना मार लागला आहे. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला घरी सोडले आहे.

हा अपघात नेमका कसा घडला, याचा तपास सुरू आहे. पण, चालकाने आपल्याला जाणूनबुजून धडक दिली असा दावा राहुल वारंवार करत आहे.

साहिल आणि मुस्कानच्या कुटुंबावर संशय का?

आपल्यावर हल्ला का झाला असावा, याबद्दल सांगताना राहुल म्हणाला की, "माझी कोणाशीही वैयक्तिक दुष्मनी नाही. अपघात झाला तेव्हा रस्त्यावर दुसरं कोणीच नव्हतं." सौरभच्या हत्येशीच या घटनेचा संबंध असावा आणि साहिल किंवा मुस्कानच्या कुटुंबीयांनीच हा कट रचला असावा, असा संशय त्याने व्यक्त केला आहे.

राहुलने या संशयाबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. त्यामुळे हे फक्त आरोप असून पोलिसांच्या तपासातच सत्य बाहेर येईल.

अद्याप पोलिसांत तक्रार नाही

या प्रकरणातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलने अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. 'आज तक'ने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात जाऊन लिखित तक्रार का दिली नाही, असे विचारले असता त्याने अजून तक्रार केली नसल्याचे सांगितले. तक्रार नोंदवली गेल्यावर आणि पोलीस तपास पूर्ण झाल्यावरच अपघाताचे खरे कारण आणि कार चालकाचा हेतू स्पष्ट होऊ शकेल.