उत्तराखंडमधील जोशीमठजवळ ६ जणांना घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर अपघाताग्रस्त झाले आहे. बद्रीनाथहून फाटाकडे जाणारे ट्रान्स भारत एव्हिएशनचे हे हेलिकॉप्टर कोसळले असून, सध्या घटनास्थळी NDRF आणि SDRF च्या टीम्स बचावकार्य करत आहेत.
डेहराडून : उत्तराखंडमधील जोशीमठजवळ एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. बद्रीनाथहून फाटाच्या दिशेने उडालेले हे हेलिकॉप्टर अचानक कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ६ जण होते. सुरुवातीला हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. पण नंतर हेलिकॉप्टर कोसळल्याच्या वृत्ताला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकृत दुजोरा दिला. अपघाताची माहिती मिळताच परिसरात मदतीसाठी NDRF आणि SDRF च्या टीम्स तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दुपारी १:१४ च्या सुमारास या हेलिकॉप्टरने बद्रीनाथहून उड्डाण केले होते. मात्र, हाती पर्वताजवळ जोरदार बर्फवृष्टी सुरू असताना अचानक या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे VT-HCX हेलिकॉप्टर होते. जोशीमठ खोऱ्यावरून जात असतानाच संपर्क तुटला आणि ट्रॅकिंग सिस्टीमवरूनही ते गायब झाले, अशी माहिती उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (UCADA) दिली आहे. जोशीमठजवळील चाई गावाजवळ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व हेलिकॉप्टर सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आणि मदतीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकासह लष्करालाही मैदानात उतरवण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये प्रताप, अरुण, शंकर गौडा, सुधीर के, एच एस नटराज आणि पायलट कॅप्टन हिमांशू हे ६ जण प्रवास करत होते. हे सर्वजण बंगळुरूचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.





