जिओ प्लॅटफॉर्म्सच्या लिस्टिंग कार्यक्रमात मंचावर मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. मात्र, कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट कुठेच दिसल्या नाहीत. पती अनंत अंबानी मंचावर भावूक भाषण करत असतानाही राधिका त्यांच्यासोबत का नव्हत्या, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या गेलेल्या 'जिओ प्लॅटफॉर्म्स'चा लिस्टिंग सोहळा मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब मंचावर एकत्र आले होते. पण, एवढ्या मोठ्या सोहळ्यात अंबानी कुटुंबातील एक महत्त्वाची सदस्य गैरहजर राहिल्याने सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मंचावर रिलायन्सचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिळाबेन, मुकेश अंबानी, नीता अंबानी, त्यांची मुले आकाश, ईशा आणि अनंत अंबानी उपस्थित होते. सोबतच मोठी सून श्लोका मेहता, जावई आनंद पिरामल आणि नातवंडेही हजर होती. या सगळ्यांनी एकत्र येऊन पारंपरिक घंटा वाजवून लिस्टिंगचा आनंद साजरा केला. पण या संपूर्ण कार्यक्रमात धाकटी सून म्हणजेच अनंत अंबानी यांची पत्नी राधिका मर्चंट कुठेच दिसल्या नाहीत.
अंबानी कुटुंबाचा कोणताही लहान किंवा मोठा कार्यक्रम असो, राधिका नेहमीच हसऱ्या चेहऱ्याने आणि उत्साहाने कौटुंबिक फोटोंमध्ये पुढे असायच्या. त्यामुळे अशा मोठ्या दिवशी त्यांची अनुपस्थिती प्रत्येकाच्या नजरेत भरली. विशेष म्हणजे, पती अनंत अंबानी मंचावरून "तीन शरीर, एक आत्मा" असे म्हणत अत्यंत भावूक भाषण करत होते. संपूर्ण सभागृह भावूक झाले असताना, अनंत यांच्या शेजारी त्यांची पत्नी राधिका उपस्थित नव्हती, यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
राधिका मर्चंट या सोहळ्याला का येऊ शकल्या नाहीत, याबद्दल अंबानी कुटुंब किंवा अधिकृत सूत्रांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे नेटकऱ्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. पतीच्या करिअरमधील एवढ्या महत्त्वाच्या दिवशी त्या का आल्या नाहीत? त्यांचीTabयेत ठीक नव्हती की काही इतर महत्त्वाच्या कामामुळे त्या येऊ शकल्या नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मीडियाचे नेहमीच लक्ष वेधून घेणाऱ्या अंबानी कुटुंबाच्या या मोठ्या सोहळ्यात राधिका यांची गैरहजर राहणे हे सध्या एक गूढच बनले आहे.
नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न
अंबानी कुटुंबाचा कोणताही कार्यक्रम असला की कॅमेऱ्याच्या नजर सर्वप्रथम धाकट्या सुनेला म्हणजेच राधिका मर्चंट यांना शोधतात. मात्र मुंबईतील स्टॉक एक्सचेंजमधील (NSE) या जिओ लिस्टिंग सोहळ्यात राधिका यांची अनुपस्थितीच सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.
आजीपासून ते नातवंडांपर्यंत संपूर्ण अंबानी कुटुंब मंचावर एकत्र दिसत होते. पण त्या परिपूर्ण फॅमिली फोटोमध्ये फक्त राधिका मर्चंट नव्हत्या.
नेहमी अंबानी कुटुंबाची लाडकी सून म्हणून समोर येणाऱ्या राधिका, पती अनंत अंबानी यांच्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या दिवशी गायब का होत्या? असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. जेव्हा अनंत अंबानी भावूक होऊन मंचावर बोलत होते, तेव्हा त्यांचे अश्रू पुसायला त्यांची पत्नी त्यांच्यासोबत नव्हती, यावरून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या शक्यता वर्तवायला सुरुवात केली आहे.





