सार
वाराणसी कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने रात्रभर ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजेसंदर्भात व्यवस्था केली. बुधवारी (31 जानेवारी) रात्रीपासून व्यास तळघरात पूजा करण्यास सुरुवात झाली.
Hindus Pray in Gyanvapi : ज्ञानवापी परिसरात असणाऱ्या व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्यास वाराणसी कोर्टाने नुकतीच परवानगी दिली. त्यानंतर आता हिंदूंकडून बुधवारी व्यास तळघरात पूजा करण्यात आली. खरंतर कोर्टाने जिल्हा प्रशासनाला सात दिवसांमध्ये हिंदूंना पूजेसंदर्भात व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.
कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरातील हालचाली वाढल्या गेल्या. जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीच पूजेसाठी व्यवस्था केली. त्यानंतर लगेच पूजेला सुरुवात झाली आहे. पूजेची व्यवस्था केल्यानंतर डीएम एस राजलिंगम यांनी म्हटले की, "आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन केले आहे."
ज्ञानवापी परिसरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ
व्यास तळघरात पूजा सुरू होण्यासह ज्ञानवापी परिसर आणि काशी विश्वनाथ मंदिर परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी स्थानिक स्थितीवर नजर ठेवून आहेत. व्यास तळघरात सध्या सामान्य भाविकांना पूजा करण्यास परवानगी नाही. पण कोर्टाच्या आदेशानंतर भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.
व्यास तळघरात करण्यात आली शयन आरती
हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जैन यांनी म्हटले आहे की, व्यास तळघरात शयन आरती करण्यात आली. याशिवाय कोर्टाच्या आदेशाचे पूजेवेळी पालन करण्यात आले. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पूजाऱ्यांद्वारे मूर्तीची स्थापना केल्यानंतर शयन आरती करण्यात आली. याशिवाय सर्व देवतांची दैनंदिन आरती देखील सुरू झाली आहे.
कोर्टाने हिंदूंना दिला पूजेचा अधिकार
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाने बुधवारी हिंदू पक्षाला व्यास तळघरात नियमित पूजा करण्यासाठी परवानगी दिली होती. व्यास तळघर ज्ञानव्यापी मशीदीच्या आतमध्ये आहे. सध्या व्यास तळघर सीलबंद करण्यात आले होते. वर्ष 1993 पर्यंत येथे हिंदू पूजा करायचे. पण आता कोर्टाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा व्यास तळघरात पूजा करण्यास सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा :
भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 जणांना सुनावली फाशीची शिक्षा