अरविंद केजरीवालांवर ईडीची मोठी कारवाई, खासगी सचिव, आप नेत्यांच्या घरांवर धाड टाकली

| Published : Feb 06 2024, 12:14 PM IST

Arvind Kejriwal

सार

दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि त्याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीच्या टीमने हे धाडसत्र अवलंबले आहे.

ED Raids AAP Leaders Arvind Kejriwal : ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने मंगळवारी सकाळी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकाने दिल्लीत जवळपास 12 ठिकाणी धाड टाकली आहे.

ईडीच्या (ED) टीमने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ही कारवाई केली आहे. ईडीने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे स्वीय सचिव तसेच आपच्या प्रमुख नेत्यांच्या देखील घरांची झडती घेणे सुरु केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांचे पर्सनल सेक्रेटरी बिभव कुमार यांच्या घरावर सुद्धा सुद्धा धाड टाकली आहे. तसेच दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार व आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत.

नेमक्या कोणत्या प्रकरणावर ईडीने केली कारवाई

दिल्ली जल बोर्डाच्या (डीजेबी) निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि त्याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case)  ईडीच्या टीमने हे धाडसत्र अवलंबले आहे. सीबीआय आणि दिल्ली सरकारच्या (Delhi Government) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने डीजेबीच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबद्दल प्रत्येकी एक गुन्हा दाखल केला आहे. या दोन प्रकरणांच्या आधारे ईडीकडून तपास सुरू आहे.

बनावट कागदपत्रे सादर करून कंपनीने मिळवले कंत्राट

सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मीटरचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि मीटर कार्यान्वित करण्यासाठी डीजेबी अधिकाऱ्यांनी एका खाजगी कंपनीला "अनावश्यक फायदा" मिळवून दिला. या कंपनीला 38 कोटी रुपयांची बेकायदेशीर कंत्राटे देण्यात आली. या कंपनीने तांत्रिक पात्रता निकष पूर्ण केले नाहीत तर बनावट कागदपत्रे सादर करून त्यांनी निविदा दाखल केली होती.

दिल्ली जल बोर्डाचे तत्कालीन मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा यांनी एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 38 कोटी रुपयांचे कंत्राट दिले, तरीही कंपनीने आवश्यक पात्रता निकष पूर्ण केले नसल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. 31 जानेवारी रोजी ईडीने डीजेबी कंत्राटदार अनिल कुमार अग्रवाल आणि अरोरा यांना पीएमएलए 2002 अंतर्गत अटक केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अरोरा यांना माहित होते की, सदर कंपनीने निविदेसाठी आवश्यक असलेले तांत्रिक पात्रता निकष पूर्ण केले नाहीत.

ईडीच्या कारवाईवर उमटल्या प्रतिक्रिया

ईडीने केलेल्या कारवाईवर शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकशाहीची हत्या होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणाले की, “सरकारच्या विरोधात बोलल्यास ईडीचे संकट मागे लागते. ईडी ही भाजपची विस्तारित शाखा आहे. आरएसएसनंतर भाजपच्या जवळचे कोण असेल तर ते ईडी आहे”. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, “ आता निवडणुक येऊ घातली आहे आणि त्यात मोदीजींचा पक्ष हरणार म्हणून ईडी-सीबीआयला कामाला लावले आहे. पण काँग्रेस ना घाबरणार आहे ना हरणार आहे. आम्ही धैर्याने लढू.”

आणखी वाचा -

किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बॅकिंघम पॅलेसची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृती सुधारण्यासाठी केली प्रार्थना

Air Pollution in Mumbai : मुंबईकरांना करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार, डाउनलोड करावे लागणार हे App

Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही