सार
मुंबई: सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. हे पोर्नोग्राफीशीसंबंधित मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहे. असा आरोप आहे की या प्रकरणी जे पैसे देशात जमा झाले होते, त्या पैशांचा या व्हिडीओच्या माध्यमातुन विदेशात व्यवहार झाला होता. अशा प्रकारे एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे गेले होते. याचीच चौकशी आता ईडीने सुरू केली आहे. तथापि, हे काही नवीन प्रकरण नसुन याआधी देखील पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली होती.
ईडीच्या या छापेमारीचा संबंध राज कुंद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारा संचलित कथित पोर्नोग्राफी नेटवर्क आणि चॅनल यांच्याशी आहे, जे सोशल मीडिया आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर कथित रुपात बेकायदेशीररीत्या अश्शील साहित्य पसरविण्याच्या आरोपांशी संबंधित आहे. या गुन्ह्याच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांच्या ठावठिकाणांवरील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांचे नाव यापूर्वीच चर्चेत आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. परंतु, नंतर त्यांना जामीन मिळाला होता. या प्रकरणी शिल्पा शेट्टीचे नाव देखील समोर आले होते. मात्र, आजपर्यंत त्यांच्यावर या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला नाही.
अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
राज कुंद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोर्नोग्राफी प्रकरणी ईडीने टाकलेल्या या छाप्यामुळे बॉलिवूड जगतात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ईडीची टीम सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.
अभिनेत्री, मॉडेल यांनी कुंद्रावर केले होते गंभीर आरोप
फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी एका पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारीमध्ये अश्लील चित्रपट बनवून वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलीस सक्रिय झाले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत होते. यावेळी पोलिसांनी चार जणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता राज कुंद्राचे नाव पुढे आले. त्या आधारे राज कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्रावर मॉडेल पूनम पांडे, अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा, अभिनेत्री सागरिका शोना सुमन यांनीही अनेक गंभीर आरोप केले होते.
तुरुंगातुन सुटल्यावर कुंद्राने केले होते चित्रपटात काम
पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगात गेलेल्या राज कुंद्राने तिथून सुटल्यानंतर 'युटी 69' नावाच्या चित्रपटात अभिनेता म्हणूनही काम केले. हा चित्रपट त्याने आर्थर जेलमध्ये घालवलेल्या ६३ दिवसांवर आधारित होता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे 2009 मध्ये लग्न झाले आणि आता त्यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत.दोघांना दोन मुले आहेत.
आणखी वाचा:
शिंदेंना उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर, 1 डिसेंबरला CM पदाचा निर्णय
एअर इंडियाच्या २५ वर्षीय वैमानिकेची आत्महत्या, प्रियकराला अटक