Delhi Red Fort Blast : दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी i-20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर परिसरात आग लागली आणि अनेक वाहने जळाली.
Delhi Red Fort Blast : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी स्फोटाने हादरली. ऐतिहासिक लाल किल्ला (Delhi Red Fort) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या Hyundai i-20 कारमध्ये सुमारे 6:52 वाजता जोरदार स्फोट झाला. या स्फोटात 9 जण ठार आणि 24 जखमी झाले. स्फोटानंतर कारने पेट घेतला आणि आसपासच्या अनेक वाहनांनी आग पकडली. मेट्रो स्टेशनच्या काचा फुटल्या आणि परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
देशभरात हाय अलर्ट, तपासाची दिशा दहशतवादाकडे
घटनेनंतर संपूर्ण दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, अयोध्या आणि काशी या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने या घटनेला अत्यंत गंभीर मानत सर्व बाजूंनी तपासाचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला असून, ही घटना दहशतवादी हल्ला आहे की अपघाती स्फोट, याचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून UAPA कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद उमरचा आत्मघाती हल्ला असल्याचा संशय
तपासात आतापर्यंत दोन संशयितांची नावे समोर आली आहेत — मोहम्मद उमर आणि तारीक. स्फोटासाठी वापरलेली i-20 कार तारीकच्या नावावर असल्याची माहिती मिळत आहे. तारीकने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या स्फोटात मोहम्मद उमर ठार झाला असण्याची शक्यता आहे. तपास पथकाने विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली असून, काही ठिकाणी संशयित हालचाली दिसल्याचे सूत्र सांगत आहेत.
स्फोटात वापरलेली i-20 कार – गुंतागुंतीचा व्यवहार उघडकीस
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार –
- स्फोटासाठी वापरलेली कार Hyundai i-20 होती.
- कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान, दिल्लीतील रहिवासी.
- सलमाननं ही कार ओखला भागातील नदीम याला विकली.
- नदीमने ती पुढे ‘रॉयल कार झोन’ या डीलरकडे विकली.
- पुलवामातील तारीकने ‘रॉयल कार झोन’कडून कार घेतली.
- तारीक मूळचा पुलवामाचा असून सध्या फरीदाबादमध्ये राहत होता.
- फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकासह अटक झालेला डॉ. मुझम्मील शकील हाही पुलवामाचाच.
- त्याच्या अटकेनंतर घाबरून तारीकने आत्मघाती स्फोट केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


