एका ग्राहकाने ५०५ रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पण त्याला जो पिझ्झा मिळाला, त्याचा आकार लहान होता. यानंतर त्याने थेट ग्राहक मंचाकडे धाव घेतली आणि त्याला तब्बल १०,५२० रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण.

मुंबई : आजकाल फूड डिलिव्हरी ॲप्सवरून जेवण मागवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. यातही पिझ्झा हा अनेकांचा आवडता पदार्थ. असाच एका ग्राहकाने पिझ्झा खाण्याची इच्छा झाल्याने ५०५ रुपयांचा एक पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा घरी आला, पण तो पाहून ग्राहकाचा मूडच गेला. कारण त्याने १० इंचाचा पिझ्झा मागवला होता, पण त्याला मिळालेला पिझ्झा फक्त ७ इंचाचा होता. म्हणजे तब्बल ३ इंच लहान!

यावर तो गप्प बसला नाही. त्याने लगेच पिझ्झा कंपनीला फोन करून तक्रार केली, पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने कायदेशीर मार्ग अवलंबला आणि ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. याचा परिणाम असा झाला की, ग्राहक मंचाने कंपनीला त्याला १०,५२० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

नेमकं काय घडलं?

या ग्राहकाने ॲपवरून ५०५ रुपयांचा १० इंची पिझ्झा ऑर्डर केला होता. पण डिलिव्हरीनंतर त्याला ७ इंचाचा पिझ्झा मिळाला. कंपनीने प्रतिसाद न दिल्याने त्याने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवली. यानंतर जिल्हा ग्राहक सेवा मंचाने हे प्रकरण हातात घेतलं.

ग्राहक मंचाने पिझ्झा आउटलेटला नोटीस पाठवली. त्यावर, 'आम्ही फक्त रेस्टॉरंट आणि ग्राहक यांच्यातील एक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहोत, पिझ्झाच्या आकारात आमची काही भूमिका नाही,' असा युक्तिवाद कंपनीने केला. पण ग्राहक मंचाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. 'मागवलेला पिझ्झा न देता दुसराच पिझ्झा देणे ही सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावीच लागेल,' असं मंचाने स्पष्ट केलं.

ग्राहक मंचाचा कडक आदेश

  • पिझ्झाची किंमत: ५०५ रुपये
  • डिलिव्हरी शुल्क: १५ रुपये
  • सेवा शुल्क: १५ रुपये
  • ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई: ५,००० रुपये
  • कायदेशीर लढाईचा खर्च: ५,००० रुपये
  • एकूण: १०,५२० रुपये

ग्राहक मंचाने स्पष्ट केलं की, ग्राहकाने ऑर्डर केलेली वस्तू त्याला व्यवस्थित मिळायलाच हवी. सेवेत कोणतीही अडचण आल्यास, थर्ड-पार्टी ॲप्ससुद्धा जबाबदार असतील. त्यामुळे प्रत्येक सेवेत कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंचाने दिली आहे.