संघमित्रा एक्सप्रेसमधून विदेशी पर्यटक कोट्याचा गैरवापर उघड झाला. १२१ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळले असून मध्य रेल्वेने ३.५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्रकरणात एजंटांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर विदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या कोट्याचा गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय प्रवाशांनी आवश्यक कागदपत्रांशिवाय ‘फॉरेन टुरिस्ट कोटा’ अंतर्गत तिकीट बुक करून प्रवास केल्याचे समोर आले असून रेल्वे प्रशासनाने या प्रकाराविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

संघमित्रा एक्सप्रेसमध्ये उघड झाला प्रकार

४ मे रोजी गाडी क्रमांक 12296 संघमित्रा एक्सप्रेसमध्ये ही अनियमितता समोर आली. काही भारतीय प्रवासी विदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत आरक्षित तिकिटांवर प्रवास करत होते, मात्र त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत सखोल चौकशी सुरू केली.

३१ गाड्यांतील बुकिंगची तपासणी

तपासादरम्यान २४ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत विदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत ३१ गाड्यांसाठी १७४ पीएनआर तयार करण्यात आल्याचे आढळले. या सर्व बुकिंगचे विश्लेषण करण्यात आले आणि अनेक संशयास्पद व्यवहार समोर आले.

१२१ प्रवासी आढळले अनियमित; लाखोंचा दंड

विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एफटी कोट्याचा गैरवापर करून ३९ पीएनआर बुक करण्यात आल्याचे उघड झाले. एकूण १२१ प्रवासी नियमबाह्य प्रवास करताना आढळले. संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार शुल्क आकारण्यात आले असून एकूण ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच अशा प्रवाशांना आरक्षित बर्थ वापरण्याची परवानगी नाकारण्यात आली.

एजंटांचा सहभाग आहे का? तपास सुरू

या बुकिंगमध्ये अधिकृत एजंट किंवा इतर कोणत्या संस्थांचा सहभाग आहे का, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. यासाठी आयआरसीटीसीकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आली असून अनधिकृत बुकिंग करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

अपात्र कोट्याअंतर्गत तिकीट बुक करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी तिकीट बुक करताना संबंधित कोट्याची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद प्रकारांची माहिती 139 हेल्पलाइन किंवा रेल मदत ॲपद्वारे देण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.