बिहारच्या बेगुसरायमध्ये नवरात्रीच्या जागरण कार्यक्रमात मोठा राडा झाला. एका पोलीस इन्स्पेक्टरने महिला डान्सरच्या कानशिलात लगावली आणि आयोजकाला मारहाण केली. लोकांनी याला विरोध केला असता, या अधिकाऱ्याने थेट लोकांवरच आपली सर्व्हिस पिस्तूल रोखली.
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात मंगळवारी पहाटे एका धार्मिक कार्यक्रमात चांगलाच गोंधळ उडाला. नवरात्रीच्या जागरण कार्यक्रमात पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये वाद झाला. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंगाछी चौकाजवळील वैष्णवी दुर्गा स्थान पूजा मंडपात पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली.
या राड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलीस अधिकाऱ्याच्या वागणुकीवर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत जागरण सुरू होतं आणि सुरक्षेसाठी तिथे पोलीस तैनात होते. वेळ खूप झाल्याचं सांगत एका इन्स्पेक्टरने आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितलं.
यानंतर हा अधिकारी थेट स्टेजवर गेला आणि आयोजकांशी हुज्जत घालू लागला, ज्यामुळे वाद आणखी वाढला. एका महिला डान्सरने असा आरोप केलाय की, पोलिसांनी सांगितल्यानंतर तिने गाणं थांबवलं होतं. पण ती स्टेजवरून खाली उतरत असतानाच इन्स्पेक्टरने तिच्या कानशिलात लगावली.
या प्रकारामुळे संतापलेल्या डान्सरने पोलिसांना जाब विचारला. भर गर्दीत आपल्यावर हात का उचलला, असा सवाल तिने केला. या संपूर्ण वादात कार्यक्रमाच्या आयोजकालाही मारहाण झाल्याचा दावा तिने केला आहे.
मारहाण न करताही कार्यक्रम थांबवता आला असता, असं या महिलेचं म्हणणं आहे. एखादी महिला पोलीस अधिकारी येऊन सूचना देऊ शकली असती, असं सांगत तिने इन्स्पेक्टरने सर्वांसमोर माफी मागावी अशी मागणी केली.
या मारहाणीनंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेक लोकांनी इन्स्पेक्टरला त्याच्या कृतीचा जाब विचारला. यातूनच जमाव आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
वातावरण तापल्यानंतर इन्स्पेक्टरने आपली सर्व्हिस पिस्तूल काढली आणि थेट जमावावर रोखली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑनलाइन चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसाने अशा प्रकारे शस्त्र का काढलं, यावर लोक प्रश्न विचारत आहेत.
स्थानिकांनी सांगितलं की, हा जागरण कार्यक्रम पहाटेपर्यंत चालणार होता. पण इन्स्पेक्टरने पहाटे तीन वाजताच कार्यक्रम बंद करण्याचा तगादा लावला होता.
पाहा व्हायरल व्हिडिओ
बेगुसरायच्या एसपींचे चौकशीचे आदेश
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेगुसरायचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनीष यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी सदर-०१ चे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवली आहे.
एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सुरू असलेल्या कार्यक्रमात मंडपात गोंधळ झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कलाकारांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला, तेव्हा कलाकार आणि आयोजकांमध्ये वाद झाला.
चौकशीच्या अहवालानुसार जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही एसपींनी स्पष्ट केलं आहे.







