हवामान आणि कमी उत्पादनामुळे २०२६-२७ मध्ये जगभरात साखरेचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्राझील, भारत आणि युरोपियन युनियनमध्ये उत्पादनाला फटका बसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वेगाने वाढत आहेत.
Sugar Price: साखरेच्या पुरवठ्याबाबत सणासुदीच्या तोंडावर एक मोठी बातमी समोर आली आहे. 'ग्रीन पूल कमोडिटीज' या मार्केट अॅनालिस्टने एक नवा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, २०२६-२७ मध्ये जगभरात साखरेचा पुरवठा ६.२८ दशलक्ष टनांनी घटू शकतो. खराब हवामान आणि अपुरे उत्पादन ही यामागची मुख्य कारणे आहेत. यामुळेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव सतत वाढत आहेत. ब्राझील, भारत आणि युरोपियन युनियनमध्ये साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
हे नवीन साखरेचे संकट काय आहे?
ब्राझीलमध्ये 'अल निनो'मुळे अवकाळी आणि अतिवृष्टी झाली. याचा फटका ऊस शेतीला बसला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील साखर उत्पादन १४ टक्क्यांनी घटले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता, 'ग्रीन पूल'ने ब्राझीलच्या मध्य-दक्षिण भागासाठी आपला साखर उत्पादनाचा अंदाज ६ लाख टनांनी कमी करून ३७.३ दशलक्ष टनांवर आणला आहे.
युरोपियन युनियनमध्येही (EU) खराब हवामानामुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यातील प्रदीर्घ उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा 'शुगर बीट'च्या (साखर बीट) उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे 'ग्रीन पूल'ला आपला उत्पादनाचा अंदाज बदलावा लागला आहे. हा अंदाज २ लाख २८ हजार टनांनी कमी करून १२.४४ दशलक्ष टनांवर आणण्यात आला आहे. भविष्यात हा अंदाज आणखी कमी केला जाऊ शकतो, असे 'ग्रीन पूल'ला वाटते. यामुळे युरोपियन साखरेच्या बाजारात पुरवठ्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते आणि या भागातील आयातीच्या मागणीवरही परिणाम होऊ शकतो.
भारतातील परिस्थिती काय?
भारतातही साखरेचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत साठा मर्यादित असल्याने, सरकारने नवीन उसाचे गाळप लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ऊस पूर्णपणे पक्व होण्याआधीच तोडल्यामुळे साखर उत्पादनात ३ ते ४ लाख टनांची घट होऊ शकते. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मान्सूनच्या शेवटी पाऊस कमी झाला. यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
पाण्याची कमतरता असल्याने शेतीसाठी धरणातील पाणी वापरण्यावर निर्बंध येऊ शकतात. यामुळे भविष्यातील उत्पादनासाठी आणखी धोका निर्माण होईल. या तीव्र पुरवठा टंचाईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे फ्युचर्स दर १९ महिन्यांच्या उच्चांकावर (२१.२९ सेंट्स प्रति पाउंड) पोहोचले आहेत. ब्राझील, भारत आणि युरोपियन युनियनमधील (EU) प्रत्यक्ष उत्पादन आणि हवामानाची स्थिती यावरच साखरेच्या दरातील पुढील बदल अवलंबून असतील.







