कर्नाटकातील दावणगेरेमध्ये पालकांच्या नकळत कार घेऊन फिरण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा भीषण अपघात झाला. नॅशनल हायवे ४८ वर त्यांची कार एका सीएनजी ट्रकला धडकली. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. अल्पवयीन मुलांच्या ड्रायव्हिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलांची 'जॉयराईड' त्यांच्या जीवावर बेतली आहे. नॅशनल हायवे ४८ वर त्यांची कार कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला असून तिसरा मुलगा जखमी झाला आहे. (कर्नाटकातील)
हा अपघात शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी दावणगेरेच्या वेशीवर असलेल्या बडा क्रॉसजवळ झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार बेंगळुरूहून दावणगेरेच्या दिशेने येत होती. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुजन (वय १६) आणि राम तेज रेड्डी (वय १७) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. सुजनचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राम तेज रेड्डीने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
या अपघातातून बचावलेल्या तिसऱ्या मुलाचे नाव आदित्य (वय १६) असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धडक इतकी भयंकर होती की कारचा पत्रा चिरडला गेला आणि मुले आतच अडकली. अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलांना बाहेर काढले. या अपघातात ट्रकचेही नुकसान झाले आहे.
पालक घरी नसताना काढली कार
मीडिया रिपोर्ट्समधील पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलांनी त्यांचे पालक घरी नसताना गुपचूप कार बाहेर काढली होती. आपण गाडी घेऊन फिरायला जात आहोत, याची कोणतीही कल्पना त्यांनी घरच्यांना दिली नव्हती.
गाडीचा वेग जास्त असल्यामुळे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांनी परवाना आणि अनुभवाशिवाय गाडी चालवण्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
या अपघात प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६ अंतर्गत निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कार ट्रकला नेमकी कशी धडकली, याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत.
या अपघातामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांच्या अहवालानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. या दुर्दैवी घटनेमुळे मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रस्ते सुरक्षा आणि अल्पवयीन मुलांच्या ड्रायव्हिंगबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.







