भारतातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सला गुंतवणूकदारांनी डोक्यावर घेतलंय. अवघ्या १०० मिनिटांत हा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झालाय. शेअरची किंमत १,०६५ ते १,११९ रुपये असून, या यशानंतर जिओ देशातील चौथी सर्वात मौल्यवान कंपनी बनेल.
गुंतवणूकदारांनी भारतातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या जिओच्या शेअर विक्रीला तुफान प्रतिसाद दिलाय. ३०,२१३ कोटी रुपयांचा हा आयपीओ खुला होताच पहिल्या १०० मिनिटांतच पूर्णपणे सबस्क्राईब झाला. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) राखीव असलेल्या कोट्यात तब्बल ३.२५ पट अर्ज आले आहेत. आज सकाळी ९ वाजता या आयपीओसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. एवढा मोठा निधी उभारणारा आणि इतक्या वेगाने सबस्क्राईब होणारा जिओचा हा आयपीओ आता देशातील एक रेकॉर्ड बनला आहे. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या १९,७५,२५,९३४ शेअर्ससाठी या अल्पावधीतच २०,०३,४३,९७२ अर्ज दाखल झाले आहेत.
शेअरची किंमत १,०६५ ते १,११९ रुपये
या आयपीओमध्ये एका शेअरची किंमत १,०६५ ते १,११९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, ग्रे मार्केटमध्येही जिओच्या शेअर्सचा भाव वधारला असून आज प्रीमियम २७६ रुपयांवर पोहोचलाय. काल हाच प्रीमियम २७३ रुपये होता, तर गेल्या आठवड्याच्या शेवटी तो २२१ रुपये होता. बाजारातील किमान २० ब्रोकरेज संस्थांनी गुंतवणूकदारांना हा आयपीओ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जिओ ठरणार देशातील चौथी सर्वात मौल्यवान कंपनी
हा आयपीओ यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील सर्वाधिक बाजारमूल्य (मार्केट कॅप) असलेल्या लिस्टेड कंपन्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेईल अशी अपेक्षा आहे. शेअरच्या १,११९ रुपये या उच्चांकी किंमतीनुसार विचार केल्यास, कंपनीचं एकूण बाजारमूल्य १०,३०,४९०.५५ कोटी रुपये इतकं होईल. या यादीत जिओ आता भारती एअरटेल (११,६८,६८९ कोटी रुपये) आणि एचडीएफसी बँक (१०,९७,१८७.३९ कोटी रुपये) यांच्या पाठोपाठ असेल. तर, १६,२७,६९३ कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड देशातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून आपलं पहिलं स्थान कायम राखेल.







