बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मित्रपक्ष भाजपला धक्का दिला आहे. औपचारिक चर्चेपूर्वीच ही घोषणा झाल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. संतोष कुमार निराला यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. जागावाटपाआधीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्रपक्ष भाजपला धक्का दिला आहे. नितीश कुमार यांचा हा एकतर्फी निर्णय असल्याच्या चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू आहेत. बिहार विधानसभा निवडणूक भाजप-जदयू (एनडीए) एकत्र लढणार आहेत. त्यामुळे जागावाटपाचे राजकारणही सुरू झाले आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये जदयूने राजपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. एनडीएतील मित्रपक्षांमधील औपचारिक चर्चेआधीच ही घोषणा झाल्याने अनेक नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.

नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात उडवली खळबळ

बक्सरमधील एका सभेत जदयूचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राजपूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री संतोष कुमार निराला निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले. राजपूर हा राखीव (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघ आहे. जागावाटपाआधीच नितीश कुमार यांच्या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कोण आहेत संतोष कुमार निराला?

माजी मंत्री संतोष कुमार निराला २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ राम यांच्या विरुद्ध पराभूत झाले होते. याआधी ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. राजपूर विधानसभा मतदारसंघात जदयूचे ते एक प्रबळ उमेदवार आहेत.

संतोष कुमार निराला यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, आम्ही बिहारमध्ये अनेक विकास कामे केली आहेत. आता निवडणुकीत तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा. संतोष कुमार निराला हे राजपूर विधानसभा मतदारसंघातून जदयूचे उमेदवार असतील. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मते देऊन विजयी करावे असे आवाहन मतदारांना केले आहे.

एनडीएतील मित्रपक्षांकडून कोणताही आक्षेप नाही

नितीश कुमार यांच्या या निर्णयावर एनडीएतील मित्रपक्षांकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. राजपूर हा मतदारसंघ भाजप-जदयूचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात जदयूचे पारंपारिक मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे युती कराराआधीच नितीश कुमार यांनी ही घोषणा केली असावी असा अंदाज आहे. जदयूच्या या घोषणेमुळे राजकीय गोंधळ वाढला आहे हे खरे आहे. राजपूर हा त्यांचाच मतदारसंघ असल्याने नितीश कुमार यांनी ही घोषणा केली असावी. औपचारिक जागावाटपाबाबतची चर्चा काही दिवसांतच पूर्ण होईल, असे भाजपचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवार जाहीर करण्याबाबत जदयूने काय म्हटले?

मागील निवडणुकीतही संतोष कुमार निराला यांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. निराला हे या मतदारसंघात सक्रिय असलेले नेते आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने कोणतेही आश्चर्य वाटले नाही. राजपूरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर करणे योग्य वाटले असावे, असे जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी सांगितले.