बाराबांकी येथील औसानेश्वर मंदिरात वीजेच्या करंटमुळे भाविकांमध्ये गदारोळ निर्माण झाला. अशातच दोन जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई : उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा मंदिरातील गदारोळानंतर उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथे देखील तशीच घटना घडली आहे. बाराबांकी जिल्ह्यातकील हैदरगढ क्षेत्रातील पौराणिक औसानेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारच्या दिवशीच मोठी दुर्घटना घडली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारसाठी जलाभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी झाली होती. रात्री 12 वाजल्यानंतर जलाभिषेक सुरू झाला होता. याच दरम्यान 2 वाजल्याच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक वीजेचा करंट पसरला गेल्याने भाविकांमध्ये अफरातफरी निर्माण झाली.

कंरट पसरल्यानंतर भाविकांचा आरडाओरड सुरू होण्यासह पळापळ झाली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय 29 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.

या घटनेवरुन मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या घटनेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले आहेत.

Scroll to load tweet…

जखमींवर रुग्णालयात उपचार

मंदिर परिसरात सुरक्षिततेसाठी आधीच पोलीस तैनात होते. पण घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू करण्यात आले आहेत.

माकडांमुळे पसरला करंट?

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीयसह जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही माकडांनी वीजेच्या तारांवर उड्या मारल्या. यामुळे तारा तुटल्या आणि मंदिर परिसरातील शेडवर पडले. याच कारणास्तव करंट फैलावला गेला आणि गदारोळाची स्थिती निर्माण झाली.

हरिद्वारमध्येही करंटमुळे गदारोळ, 7 जणांचा मृत्यू

बारांबाकीपूर्वी रविवारी हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात करंट पसरल्याच्या अफवेमुळे गदारोळ निर्माण झाला होता. यामुळे 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. काहीजण गंभीर रुपात जखमी झाले.