सार
अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे मुश्किल होत असल्याचे उत्तर प्रदेशातील पोलिसांनी म्हटले आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून मंदिर सामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने आता मंदिरात अलोट गर्दी होत आहे. यामुळे वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे असा प्रश्न उत्तर प्रदेश पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.
रामललांच्या दर्शनासाठी मध्यरात्री तीन वाजल्यापासूनच भाविक रांगेत उभे राहण्यास सुरुवात करत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला अयोध्येत कडाक्याची थंडी पडली असतानाही भाविकांची गर्दी कमी होत नाहीय.
उत्तर प्रदेश पोलिसांनी नागरिकांना केले हे खास आवाहन
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर तिसऱ्या दिवशी आजही प्रभू श्रीरामांच्या भक्तांमध्ये रामललांच्या दर्शनासाठी फार मोठा उत्साह दिसून येत आहे. अयोध्येचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी म्हटले की, “दर्शनासाठी सातत्याने भाविकांची गर्दी होत आहे. पण वाढती गर्दी पाहाता आम्ही जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांनी रामललांच्या दर्शनासाठी काही दिवस येऊ नये असे आवाहन करत आहोत.” रामललांच्या दर्शनासाठी गर्दी कमी होईल त्यावेळेस येण्याची विनंतीही कुमार यांनी भाविकांना केली आहे.
रामललांच्या दर्शनाची वेळ
राम मंदिरात सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करुन देण्यात आले आहे. पण रामललांच्या दर्शनासाठी काही वेळा ठरवण्यात आल्या आहेत. या वेळेतच भाविकांना दर्शन मिळणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. रामललांचे पहिले दर्शन सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
आणखी वाचा :
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा पहिला Video समोर, पाहा परिसरातील मनमोहक दृश्य
रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा