अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतील गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. गायिका सावनी रवींद्र हिने १२ वर्षांपूर्वी 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेसाठी गाणे गायले होते.

मुंबई: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे दोन भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेचे गीत प्रेक्षकांना प्रचंड आवडलं असून अनेकांनी त्याची रिंगटोन ठेवली आहे.

गायिकेने भावना केल्या व्यक्त 

गायिका सावनी रवींद्र हिने यावेळी तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने बोलताना म्हटलं आहे की, 'योगायोग! 12 वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनून घराघरात पोहोचले. 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेने आणि त्यातल्या गाण्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी तेजूसाठी पुन्हा गाण्याचा योग आला... निमित्त होतं 'वीण दोघांतली ही तुटेना' या झी मराठीवर सुरू झालेल्या नवीन मालिकेच्या शीर्षकगीताचं! आयुष्यात एक वर्तुळ पूर्ण झालं. आमच्या जोडीला खूप सारं प्रेम देण्यासाठी धन्यवाद.'

सावनी पुढं काय म्हणते? 

'प्रिय तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे दादा, 'वीण दोघांतली ही तुटेना'साठी खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा. इतिहासाची पुनरावृत्ती होवो हीच मोरया चरणी प्रार्थना! आणि हो... मालिकेचं शीर्षकगीत ऐकून तुमचा अभिप्राय नक्की कळवा.' सावनी पुढं म्हणते की आपण तेजश्री आणि सुबोध या दोघांची आलेली नवीन मालिका नक्कीच पाहायला हवी असं अवाहन तीने यावेळी केलं आहे.

View post on Instagram

तेजश्रीने केली कमेंट 

सावनीच्या इंस्टाग्रामवरच्या या पोस्टवर तेजश्रीने हर्टची इमोजी कमेंट केली आहे. या कमेंटवरून दोघींमधील प्रेम दिसून येत आहे. यावेळी चाहत्यांनी हे गाणे आम्हाला खूप आवडल्याचं म्हटलं आहे. यावेळी काही चाहत्यांनी गायिका आणि अभिनेत्री असा स्वीट कॉम्बो असून दोघींची छान जोडी असल्याचं म्हटलं आहे. काही चाहत्यांनी उर्वरित मालिकेची प्रतीक्षा असल्याचं सांगितलं.