- Home
- Entertainment
- Saiyaara Day 9 Box Office Collection : 'सैयारा'ने 200 कोटींच्या क्लबमध्ये धडक दिली; 9 दिवसांत 217.25 कोटींची कमाई
Saiyaara Day 9 Box Office Collection : 'सैयारा'ने 200 कोटींच्या क्लबमध्ये धडक दिली; 9 दिवसांत 217.25 कोटींची कमाई
मुंबई - मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटाने अधिकृतपणे 200 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु असून अगदी नवोदित कलाकारांनी ही मजल गाठून दाखवली आहे. जाणून घ्या, शनिवारच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

9 दिवसांत 217.25 कोटी रुपयांची भारतातील नेट कमाई
आहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या पदार्पणाने सजलेला हा रोमँटिक ड्रामा, रिलीजनंतर अवघ्या 9 दिवसांत 217.25 कोटी रुपयांची भारतातील नेट कमाई करताना बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. Sacnilk च्या अंदाजानुसार, या चित्रपटाने केवळ अपेक्षा ओलांडल्या नाहीत, तर आता तो 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे.
बॉक्स ऑफिस रिपोर्ट
दुसऱ्या शनिवारच्या दिवशी 'सैयारा'ने सुमारे 26.5 कोटी रुपये कमावले, जे दुसऱ्या शुक्रवारच्या 18 कोटींच्या कमाईच्या तुलनेत जवळपास 50 टक्के वाढ दर्शवते. विशेष म्हणजे, ही कमाई पहिल्या शनिवारइतकीच असून, चित्रपटाची कमाईची गती अजूनही टिकून असल्याचे दाखवते. केवळ दुसऱ्या आठवड्याच्या दोन दिवसांत 'सैयारा'ने 44.5 कोटींची कमाई केली आहे.
विक्रमी कामगिरी
पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने 172.75 कोटींची कमाई केली. चांगल्या ‘वर्ड ऑफ माऊथ’मुळे त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला याचा एकूण आकडा 200 कोटींच्यावर बंद होईल असे भाकीत होते, परंतु आता हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 2025 मध्ये विक्की कौशलच्या 'छावा'नेच हे टप्पे गाठले आहेत.
वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
'सैयारा'ने आता अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' ला मागे टाकत 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे विक्की कौशलचा 'छावा', ज्याने थक्क करणारी 601 कोटींची कमाई केली आहे.
स्क्रीन काउंटमध्ये वाढ
चित्रपटाच्या वाढत्या यशाचे श्रेय स्क्रीन काउंट वाढल्याला दिले जात आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, 'सैयारा' सुरुवातीला 2,225 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे तो आता देशभरात 3,650 स्क्रीन्सवर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत आणखी कमाई वाढण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक फायदेशीर चित्रपटांच्या यादीत वाटचाल
मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट केवळ यशस्वीच नाही, तर सर्वाधिक फायदेशीर बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे. अंदाजे 40-50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला 'सैयारा' आता 250 कोटींच्या कमाईकडे वेगाने वाटचाल करत आहे.
