Mahavatar Narsimha चित्रपटाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, किती कोटी कमावले?
मुंबई - दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा पौराणिक अॅक्शन ड्रामा ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. या चित्रपटातील अॅनिमेशन आणि कथानक प्रक्षेकांच्या पसंतीस उतरताना दिसून आहे. जाणून घ्या याबद्दल..
भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेंड?
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सैयारा’ या चित्रपटाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, तसेच पवन कल्याण आणि बॉबी देओल यांच्या स्टारडमने सजलेल्या ऐतिहासिक चित्रपट ‘हरि हर वीर मल्लू’सोबत स्पर्धा असतानाही, ‘महावतार नरसिंह’ या अॅनिमेटेड चित्रपटाने कमाईच्या आकड्यांवरून सिद्ध केले आहे की प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूपच पसंती दिली आहे.
हा चित्रपट केवळ हिंदीतच नव्हे तर तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व भाषांमधून चित्रपटाला एकसारखा प्रतिसाद मिळत आहे. कथानकातील पौराणिक बाजू, अॅनिमेशनची गुणवत्ता आणि प्रभावी सादरीकरण यामुळे ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. अशा प्रकारच्या अॅनिमेटेड पौराणिक चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेंड तयार केला असून, या चित्रपटाचे यश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
‘महावतार नरसिंह’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘महावतार नरसिंह’ने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व पाच भाषांमधून मिळून सुमारे 2.29 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई हिंदी बेल्टमधून झाली असून, हिंदी व्हर्जनने एकट्याने सुमारे 1.51 कोटी रुपये कमावले आहेत.
तेलुगू व्हर्जनने 38 लाख रुपये, तर कन्नड व्हर्जनने 7 लाख रुपये आणि मल्याळम व्हर्जनने 3 लाख रुपये कमावले आहेत. तमिळ व्हर्जनची कमाई मात्र तुलनेने कमी असून, त्याने 2 लाख रुपयांची कमाई केली आहे.
या आकड्यांवरून स्पष्ट होते की ‘महावतार नरसिंह’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, विशेषतः हिंदी प्रेक्षक वर्गाने या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे.
‘महावतार नरसिंह’ विषयी काय महत्त्वाचे?
‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाची निर्मिती क्लीम प्रोडक्शन्स आणि होम्बळे फिल्म्स या दोन प्रतिष्ठित बॅनर्सखाली झाली आहे. यातील होम्बळे फिल्म्स हीच ती कंपनी आहे, जिने ‘KGF’ आणि ‘कांतारा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट फ्रँचायझी सिनेमा क्षेत्राला दिल्या आहेत.
‘महावतार नरसिंह’ हे या दोन्ही प्रोडक्शन हाऊसेसच्या सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिलं पर्व आहे. या चित्रपटात भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. पौराणिक मान्यतेनुसार, हे अवतार भगवान विष्णूंनी आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि दानव हिरण्यकश्यपाचा वध करण्यासाठी घेतले होते.
हा अॅनिमेटेड मायथॉलॉजिकल अॅक्शन ड्रामा चित्रपट 25 जुलै 2025 रोजी भारतात 2D आणि 3D दोन्ही व्हर्जनमध्ये एकाच वेळी पाच भाषांमध्ये (हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम) प्रदर्शित करण्यात आला आहे.
महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्समधील उर्वरित चित्रपट कोणते?
‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट म्हणजे महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स या भव्य पौराणिक चित्रपट मालिकेची पहिली कडी आहे. या युनिव्हर्सअंतर्गत एकूण ७ चित्रपटांची योजना करण्यात आली आहे. हे सर्व चित्रपट दर दोन वर्षांच्या अंतराने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या फ्रँचायझीचे उर्वरित ६ भाग पुढीलप्रमाणे असतील:
महावतार परशुराम – प्रदर्शन वर्ष: 2027
महावतार रघुनंदन – प्रदर्शन वर्ष: 2029
महावतार द्वारिकाधीश – प्रदर्शन वर्ष: 2031
महावतार गोकुलनंदन – प्रदर्शन वर्ष: 2033
महावतार कल्कि – भाग 1 – प्रदर्शन वर्ष: 2035
महावतार कल्कि – भाग 2 – प्रदर्शन वर्ष: 2037
भगवान विष्णूच्या विविध अवतारांच्या कथा
या मालिकेतून भगवान विष्णूच्या विविध अवतारांच्या कथा भव्य आणि आधुनिक सिनेमॅटिक पद्धतीने सादर केल्या जाणार आहेत. या चित्रपटमालिकेचा उद्देश भारतीय पौराणिकतेचा जागतिक स्तरावर गौरव करण्याचा असून, प्रत्येक भागात एक वेगळी पौराणिक कथा आधुनिक सादरीकरणात पाहायला मिळणार आहे.

