आता हा कार्यक्रम नव्या रुपात, नव्या संकल्पनेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कॉमेडीचं गँगवॉर’ अशा भन्नाट थीमसह हा नवा सीझन प्रेक्षकांसाठी हास्याचा नवा उत्सव ठरणार आहे.

मुंबई - मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. विनोदाची चतुर मांडणी, गुणी कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि प्रेक्षकांशी साधलेला सहज संवाद यामुळे हा कार्यक्रम प्रत्येक घरात आवडीने पाहिला जातो. आता हा कार्यक्रम नव्या रुपात, नव्या संकल्पनेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कॉमेडीचं गँगवॉर’ अशा भन्नाट थीमसह हा नवा सीझन प्रेक्षकांसाठी हास्याचा नवा उत्सव ठरणार आहे.

नव्या पर्वात नव्या गँग आणि दमदार कलाकरांची फौज

नव्या सीझनमध्ये काही जुन्या आवडत्या कलाकारांसह नवे चेहरेही सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांचे लाडके कलाकार श्रेय बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे हे पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोबत या नव्या पर्वात गौरव मोरे आणि बहुपरिचित अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांचाही सहभाग आहे. या जोड्यांची विनोदी टायमिंग, एकमेकांमधील सुसंवाद आणि संवादातील टोकदार टायमिंग ही या पर्वाची खासियत ठरणार आहे.

सूत्रसंचालनाची धुरा अभिजीत खांडकेकरकडे

या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करत आहे. त्याचा अनुभव, संवाद कौशल्य आणि उत्साही वाणीतून कार्यक्रमात आणखी रंग भरले जाणार आहेत. अभिजीतने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली असून आता ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर तो नव्या रुपात पाहायला मिळेल. त्याचे सादरीकरण कार्यक्रमाला एक वेगळं व्यासपीठ मिळवून देईल.

26 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला

नवीन पर्वाची सुरूवात २६ जुलैपासून होणार आहे आणि त्याची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना लागली आहे. मागील अनेक पर्वांमध्ये 'चला हवा येऊ द्या'ने समाजातील विविध घटकांवर भाष्य करताना हास्याच्या माध्यमातून विचार मांडले. आता ‘गँगवॉर’च्या थीममध्ये हास्याच्या गँगमधील स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

गँगलॉर्ड्सचे विशेष सादरीकरण

या पर्वात पाच गँगलॉर्ड्स म्हणजेच पाच मार्गदर्शक/मेंटॉर्स प्रत्येक भागात विनोदी सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या मजेदार परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांना हास्याचा दुहेरी डोस मिळणार आहे. प्रत्येक गँगलॉर्डच्या गँगमध्ये महाराष्ट्रातून निवडलेले उत्साही आणि होतकरू विनोदी कलाकार असतील. ह्या कलाकारांमध्ये झळकणारा उत्साह, नवीन आयडिया, आणि धमाल लेखन हे सगळं एकत्र येऊन कार्यक्रमात नवा उत्सव घडवणार आहे.

महाराष्ट्रभरातून २५ नवोदित कलाकार

या नव्या पर्वात महाराष्ट्रभरातून निवडलेले २५ नवोदित विनोदी कलाकार त्यांच्या कला-कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या नव्या कलाकारांसाठी ‘चला हवा येऊ द्या’ हे व्यासपीठ म्हणजे एक स्वप्नसाकार होण्यासारखं आहे. त्यांच्यासाठी हे एक संधीचे सुवर्णद्वार आहे, जे त्यांना मोठ्या व्यासपीठावर पोहोचवू शकते. प्रेक्षकांसाठी हे एक वेगळा अनुभव असेल, नवे चेहरे, नवे विनोद आणि नवा दृष्टिकोन.

जबरदस्त लेखन टीम

या पर्वाचे लेखन योगेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अनेक नवोदित आणि होतकरू लेखक सहभागी झाले आहेत. या टीममध्ये अनिश गोरेगावकर, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, अक्षय जोशी, पूर्णानंद वांढेकर आणि अमोल पाटील यांचा समावेश आहे. लेखनात नवा दृष्टिकोन, नवे पंचेस, आणि वर्तमान घडामोडींचा हास्यात्मक परिप्रेक्ष्यातील उपयोग हा विशेष ठरणार आहे.

नवा दिवस, नवी वेळ

या नव्या पर्वाच्या वेळेतही लक्षणीय बदल करण्यात आला आहे. आधी ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवशी रात्री दाखवला जायचा. मात्र, नवीन पर्व आता शनिवार आणि रविवार, म्हणजेच आठवड्याच्या शेवटी, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हास्याचा आनंद लुटू शकणार आहे.

नवीन वेळ – रात्री ९ वाजता, ही वेळ आता अधिक अनुकूल ठरणार आहे. दिवसभराच्या धावपळीमधून आराम मिळाल्यावर हास्याची साथ म्हणजे हा कार्यक्रम!

‘कॉमेडीचे गँगवॉर’, एक नव्या पिढीचा प्रयोग

‘चला हवा येऊ द्या’चा हा नवा प्रयोग म्हणजे विनोदाला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न आहे. कॉमेडीचे गँगवॉर ही संकल्पना एका स्पर्धात्मक आणि सर्जनशीलतेने भरलेल्या मंचावर विनोद मांडण्याची प्रक्रिया दर्शवते. प्रत्येक गँगमधील कलाकार आपापल्या पद्धतीने सादरीकरण करतील आणि प्रेक्षक ठरवतील की कोणी सर्वश्रेष्ठ!

या माध्यमातून नव्या कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करता येणार आहे आणि प्रेक्षकांना विनोदाचे विविध रंग अनुभवता येणार आहेत. जुन्या फॉर्मेटच्या पलीकडे जाऊन 'चला हवा येऊ द्या'ने आता एक वेगळी शैली स्वीकारली आहे, जी आजच्या प्रेक्षकांना अधिक आकर्षित करेल.

‘चला हवा येऊ द्या’चा नवा सीझन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हे, तर एक हास्याचा महोत्सव आहे. जुने आवडते कलाकार, नवे उत्साही चेहरे, वेगळी संकल्पना, आणि झगमगते सादरीकरण यामुळे हा सीझन नक्कीच लक्षवेधी ठरेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नवोदित कलाकार, सशक्त लेखन, आणि अनुभवी सूत्रसंचालन यांच्या संगमातून ‘चला हवा येऊ द्या, कॉमेडीचे गँगवॉर’ हा नवीन अध्याय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यात शंका नाही.

तर २६ जुलैपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता, टीव्हीपुढे बसायला विसरू नका... कारण हसण्याचं नवं पर्व सुरू होणार आहे!