हिंदी सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध कलाकार बोमन इराणी यांच्या अनेक सिमेमांमधील भूमिका गाजल्या आहेत. अलीकडेच बोमन यांनी एका वेबसीरित अनोख्या पद्धतीचे काम केले आहे. एवढेच नव्हे एका मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेमाबद्दलचेही विधान केलेय. 

Mumbai : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील डॉ. अस्थाना आणि ‘थ्री इडियट्स’मधील व्हायरस या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या दोन्ही व्यक्तिरेखा साकारून अभिनेते बोमन इराणी यांनी आपल्या अभिनय कौशल्याने एक वेगळंच स्थान निर्माण केलं. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ या वेबसिनेमात त्यांनी एक अनोखी भूमिका साकारली. या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणतात, “‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ मधील भूमिका माझ्या मनाला विशेष भावणारी आहे. हा सिनेमा केवळ एक भूमिका नव्हती, तर तो माझ्या कारकिर्दीत एक नविन अध्याय घेऊन आला. या सिनेमानं मला एक नवं कुटुंब दिलं – कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वजण अजूनही एका WhatsApp ग्रुपवर एकत्र आहोत. विशेषतः रत्ना पाठक-शाह यांच्यामुळे सतत काही ना काही शिकायला मिळतं.”

मेकअप उतरवला की भूमिका संपते”

भूमिकेच्या प्रभावातून बाहेर पडणं कलाकारासाठी तितकंच कठीण असतं. बोमन यांना हा अनुभव एका नाटकाच्या प्रयोगानंतर आला होता. “‘आय अ‍ॅम नॉट अ बाजीराव’ या नाटकात मी काम करत होतो, आणि एकदा प्रयोगानंतर मी दिवंगत अभिनेते सुधीर जोशी यांना सांगितलं की, पात्र डोक्यातून जात नाही. त्यांनी मला आरशासमोर बसवलं, मेकअप काढायला सांगितलं आणि म्हटलं – ‘बघ, आता तू बोमन आहेस’. त्या दिवशी मला समजलं की, कलाकारानं भूमिकेतून बाहेर यायला शिकायलाच हवं. आजही मी तेच तंत्र वापरतो आणि प्रत्येक वेळी सुधीर जोशी यांची आठवण येते.”

प्रत्येक भूमिका म्हणजे ‘कॅरेक्टर रोल’च 

‘कॅरेक्टर रोल’ ही संकल्पना प्रत्येक कलाकारासाठी अपरिहार्य आहे असं सांगताना बोमन म्हणतात, “प्रत्येक भूमिका स्वतःमध्ये एक मानसिक आणि भावनिक विश्व घेऊन येते. ती भूमिका कोणत्या जीवनमूल्यांवर आधारलेली आहे, ती कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देते – हे समजून घेणं म्हणजे खरा ‘कॅरेक्टर रोल’ साकारणं. हे करणं हे काळाची गरज नाही, तर अभिनयाचा खरा आत्मा आहे.”

“मी मराठी रंगभूमीचा चाहता आहे” 

मराठी रंगभूमीबाबत बोलताना बोमन म्हणतात, “‘संगीत देवबाभळी’ पाहून मी भारावून गेलो. लेखक प्राजक्त देशमुखचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही – इतकी प्रतिभा फार कमी कलाकारांमध्ये असते. मी शिवाजी मंदिर परिसरात वाढलोय, त्यामुळे मराठी नाटकं, तिथलं वातावरण – याचा खोलवर प्रभाव माझ्यावर आहे. मी केवळ रसिक नव्हे, तर मराठी रंगभूमीचा निस्सीम भक्त आहे.”

ओटीटी म्हणजे स्पर्धा नाही, ती तर एक नवी संधी

ओटीटीमुळे पारंपरिक माध्यमांवर परिणाम होतो का, यावर बोमन स्पष्ट मत मांडतात, “मी ओटीटीकडे स्पर्धा म्हणून पाहत नाही. ती एक नवी संधी आहे – नव्या कथा, नव्या कलाकार, वेगळं सादरीकरण. आणि जसं सिनेमागृहात जाणं महाग झालंय, तसं वेबमाध्यम सहजगत्या घरबसल्या पाहता येतं, त्यामुळे त्याचा स्वीकार स्वाभाविकच आहे.”

“मराठी सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्धार”

मराठी चित्रपटात निर्मिती करण्याबाबत विचारता बोमन म्हणतात, “माझ्याकडे एक अशी कथा आहे, ज्याला केवळ आणि केवळ मराठीतच न्याय देता येईल. त्यामुळे मी त्या विषयावर मराठी चित्रपटच बनवणार आहे. आज निर्मिती करणं थोडं अवघड झालं असलं तरी त्या कलाकृतीसाठी मी संपूर्ण प्रयत्न करत आहे. कारण मला त्या कथेबाबत प्रचंड विश्वास आहे.”

 दमदार स्क्रिप्ट आणि योग्य दिग्दर्शक हवेच

चित्रपट स्वीकारताना केवळ कथा महत्त्वाची नसते, तर दिग्दर्शक कसा आहे हेही महत्त्वाचं असतं, असं ते स्पष्ट करतात. “संहिता दमदार असण्यापेक्षा ती अशा पद्धतीनं मांडलेली असावी की, दिग्दर्शकाला कुठेही पळवाटा मिळू नयेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे – दिग्दर्शक माणूस म्हणून कसा आहे, हे मी पाहतो. हे सगळं जुळून आलं, तरच मी त्या कलाकृतीचा भाग होतो.”

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.