वैद्यकीयदृष्ट्या मी मेलो होतो...,श्रेयस तळपदेने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
- FB
- TW
- Linkdin
श्रेयस तळपदेने शेअर केला अनुभव
अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 डिसेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. एका मुलाखतीदरम्यान त्या दिवशी नेमके काय घडले होते, याची माहिती त्याने शेअर केली.
श्रेयस तळपदेने दिला सल्ला
'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेशी बातचित करताना श्रेयस तळपदेने सल्ला देत म्हटले की, "आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जीवनात आलेला एखादा अनुभव तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो."
श्रेयस सलग अडीच वर्षे करतोय काम
श्रेयसने सांगितले की, गेले सलग अडीच वर्ष मी काम करत आहे. पुष्पा सिनेमा आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू होता.
"काही महिन्यांपासून थकवा जाणवत होता"
श्रेयसने पुढे असेही सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून मला थकवा जाणवत होता. हा त्रास थोडासा असामान्य वाटत होता. सलग काम करत असल्याने थकायला होत असावे, असे मला सुरुवातीला वाटले. त्यामुळे जे काम सुरू होते, ते करत राहिलो.”
वैद्यकीय तपासण्यांनंतर औषधोपचार केले सुरू
शारीरिक थकवा जाणवत असल्याने त्याने काही वैद्यकीय तपासण्या केल्या. ECG, 2D ईको, सोनोग्राफी आणि रक्त तपासण्याही केल्या. रिपोर्ट्समध्ये त्याच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे आढळले. या समस्येवर औषधोपचार सुरू होते.
वैद्यकीयदृष्ट्या माझा मृत्यू झाला होता - श्रेयस
श्रेयसने हृदयविकाराच्या झटक्याबाबत सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणार होता. तो म्हणाला की, वैद्यकीयदृष्ट्या माझा मृत्यू झाला होता. हृदयविकाराचा आलेला हा झटका अतिशय गंभीर स्वरुपातील होता. माझा जीव वाचवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि माझ्या पत्नीचा मी किती ऋणी आहे, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
श्रेयससोबत त्या दिवशी नेमके काय घडले?
श्रेयसने सांगितले की, सिनेमाच्या चित्रिकरणदरम्यान शेवटचा शॉट दिल्यानंतर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि मला डाव्या हातामध्ये वेदना जाणवू लागल्या. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन कपडे बदलण्यासाठीही मला खूप कष्ट घ्यावे लागले.
स्नायूदुखीचा त्रास
मला वाटले की स्नायूदुखीचा त्रास होत आहे. कारण आम्ही एक अॅक्शन सीन शूट करत होतो. जसा मी आपल्या कारपर्यंत पोहोचलो, तेव्हा मला वाटले आता थेट हॉस्पिटल गाठावे. पण यापूर्वी घरी जायला हवे, असा विचार केला.
पत्नीने श्रेयसला हॉस्पिटलमध्ये केले दाखल
श्रेयसने सांगितल की, पत्नी दीप्तिने माझी अवस्था पाहिली आणि 10 मिनिटांत आम्ही हॉस्पिटल गाठले. तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते, मग आम्ही यू-टर्न घेतला. काही वेळाने माझी शुद्ध हरपली.
काही मिनिटांसाठी थांबला होता श्रेयसचा श्वास
“माझ्या हृदयाचे ठोके काही मिनिटांसाठी थांबले होते. डॉक्टरांनी सीपीआर दिला. इलेक्ट्रिकल शॉकही दिला. अशा प्रकारे त्यांनी माझा जीव वाचवला”, असेही श्रेयसने मुलाखतीत सांगितले.
आणखी वाचा
चिनी न्यूमोनियाचा भारतात शिरकाव? कोलकातामधील 10 वर्षीय मुलीला Chinese Pneumoniaची लागण
Panchak : पंचक सिनेमाच्या रिलीजपूर्वी माधुरी दीक्षितने कुटुंबीयांसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
Japan Earthquake : साऊथ स्टार ज्युनिअर NTR थोडक्यात बचावला, भूकंपापूर्वी परतला मायदेशी