कपिल शर्माच्या शो मध्ये जज म्हणून झळकणारी अर्चना पुरण सिंग हिची दुबईत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल अभिनेत्रीने स्वत: व्लॉगमधून माहिती दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व आणि सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये जज म्हणून झळकणारी अर्चना पूरण सिंग हिची दुबई दौऱ्यात ऑनलाईन फसवणूक झाली आहे. अर्चना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स यूट्यूब व्लॉगमधून नेहमी शेअर करत असते. अलीकडेच तिच्या ताज्या व्लॉगमधून तिने दुबईत घडलेली ही धक्कादायक घटना उघड केली.
अर्चनाची फसवणूक
अर्चना सध्या तिचा पती परमीत सेठी आणि दोन मुलं आर्यमन व आयुष्मान यांच्यासह दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या दरम्यान तिने आयफ्लाय दुबईमध्ये स्कायडायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी ऑनलाईन तिकिटं बुक केली होती. मात्र जेव्हा संपूर्ण कुटुंब स्कायडायव्हिंग सेंटरला पोहोचलं, तेव्हा तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या नावावर कोणतेही बुकिंग नाही. त्यावेळी लक्षात आलं की त्यांनी ज्या वेबसाइटवरून बुकिंग केलं, ती वेबसाइट बनावट होती.
“तिकिटं स्वस्त नव्हती… आणि सगळी रक्कम गेली!”
या प्रसंगाबद्दल अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितलं, “आम्ही आयफ्लाय दुबईसाठी तीन स्लॉट बुक केले होते. पण इथे आलेल्या मॅडम सांगतायत की तुमचं कोणतंही बुकिंग नाही. म्हणजे आम्हाला फसवलं गेलंय. ज्या वेबसाइटवरून आम्ही पैसे भरले, ती त्यांची अधिकृत वेबसाइटच नव्हती. आणि या तिकिटांची किंमतही कमी नाही… सगळी रक्कम वाया गेली.”
तिने पुढे म्हटलं, “दुबईसारख्या नियमबद्ध देशात असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. हे खूपच धक्कादायक आहे.” अर्चनाच्या म्हणण्यानुसार, ती बनावट वेबसाइट आता इंटरनेटवरून गायब झाली आहे.

मुलाला संशय
अर्चनाचा मोठा मुलगा आर्यमन यानेदेखील त्या वेबसाइटबद्दल शंका व्यक्त केली होती. तो म्हणाला, “मी चार मिनिटांचा पॅकेज निवडला होता, पण ते आपोआप दोन मिनिटांवर आलं. तेव्हा मला वाटलं की ही काहीतरी चूक असेल.” परमीत सेठी यांनी देखील नमूद केलं की, “शेवटी आम्ही रोख पैसे दिले, पण नंतर लक्षात आलं की ती पण फसवणूकच होती.”
फसवणुकीमुळे अर्चना पूरण सिंग आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान तर झालंच, पण मानसिक त्रासही मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. नेमकी किती रक्कम गमावली हे तिने उघड केलं नाही, मात्र संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे खूपच निराश झालं आहे.
अर्चनाच्या कामाबद्दल…
कामाच्या आघाडीवर पाहिलं तर अर्चना पूरण सिंग नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘नादानियां’ या शोमध्ये श्रीमती ब्रागांजा मल्होत्रा या भूमिकेत झळकली होती. सध्या ती कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा भाग आहे. तिचा आगामी चित्रपट 'टोस्टर' असून त्यामध्ये ती राजकुमार राव, सान्या मल्होत्रा आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिकेसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक दासचौधरी करत आहेत.


