अमिताभचे वडील हरिवंशराय बच्चन यांची लव्हस्टोरीही अगदी फिल्मी होती. एका मित्राच्या घरी त्यांनी 'क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी' ही कविता ऐकवली, जी ऐकून तेजी रडू लागल्या, मग दोघेही भावूक झाले. त्याच दिवशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Harivansh Rai Bachchan Love Story: 'कौन बनेगा करोडपती'मध्ये ३१ ऑक्टोबर रोजी दिलजीत दोसांझने हजेरी लावली होती. यावेळी गाण्यांची मैफिल रंगली. वातावरण रोमँटिक झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी आपल्या आई-वडिलांच्या प्रेमकथेबद्दल सांगितले. त्यांची पहिली भेट, प्रेम आणि लग्न याबद्दल त्यांनी अगदी सहजपणे सांगितले.

शीख आई आणि कायस्थ वडिलांचे पुत्र आहेत अमिताभ बच्चन

'कौन बनेगा करोडपती' या क्विझ शोमध्ये ३१ ऑक्टोबरला पंजाबमधील पूरग्रस्त उपस्थित होते. यावेळी अमिताभ यांनी पंजाबशी असलेले आपले नाते सांगितले. अमिताभ म्हणाले की, मी अर्धा पंजाबी आहे. मी सोढी कुटुंबातील आहे. एके दिवशी माझे वडील हरिवंशराय बच्चन त्यांच्या खास मित्राच्या घरी कविता ऐकवत होते. त्या कुटुंबाने तेजीलाही बोलवा असे सांगितले... हे नाव त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकले होते. ते मोठ्या उत्सुकतेने तेजीच्या येण्याची वाट पाहू लागले. त्यानंतर तेजी आल्या. बाबूजी कविता ऐकवत होते. 'क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी' ही एक भावनिक कविता होती... हे ऐकून बाबूजींचे मित्र भावूक होऊन तिथून निघून गेले. तर तेजी यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना पाहून बाबूजींच्या डोळ्यातही अश्रू आले. यानंतर तेजी आणि हरिवंशराय एकमेकांना मिठी मारून खूप रडले. त्याचवेळी बाबूजींचे मित्रही तिथे आले. दोघांना असे भावूक झालेले पाहून त्यांनी लगेच हार आणून लग्न करण्याचा सल्ला दिला.

अमिताभच्या वडिलांनी एका नजरेतच घेतला लग्नाचा निर्णय

यानंतर, त्याच ठिकाणी त्यांनी ठरवले की लग्न करायचे तर तेजी यांच्याशीच करायचे. तेजी यांनीही जवळपास असाच निर्णय घेतला होता. यानंतर दोघांनी लवकरच लग्न करून एकमेकांचा हात धरला. हा संपूर्ण किस्सा त्यांनी आपल्या एका पुस्तकातही सांगितला आहे. त्यात त्यांनी त्या दिवसाची संपूर्ण घटना सविस्तरपणे वर्णन केली आहे.