Jalgaon Crime : जळगावामध्ये दिवसाढवळ्या दोन अज्ञात व्यक्तींकडून एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, वाळू व्यवसायातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठेतरी गुन्हे घडतात. अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहर शुक्रवारी (04 जुलै) दुपारी रक्तरंजित घटनेनं हादरून गेलं. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरदिवसा दोन अज्ञात हल्लेखोरांनी २६ वर्षीय आकाश कैलास मोरे याच्यावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ गोळ्या झाडत निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायातील वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आकाश मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) याच्या शरीरावर इतक्या गोळ्या झाडण्यात आल्या की त्याची अक्षरशः चाळण झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
स्टेटस ठरलं मृत्यूचं कारण?
हत्या होण्याआधी दोन दिवस आधी आकाश मोरे याने आपल्या सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ टाकला होता. त्यामध्ये असे लिहिले होते की, “शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोखठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा.” या स्टेटसनंतर काहीच तासांत झालेल्या या हल्ल्यामुळे, वर्चस्ववाद आणि सोशल मीडियावरील वैरभावना या हत्या मागचं कारण असू शकतं, असा पोलिसांचा संशय आहे.
गोळीबारात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, आकाशच्या शरीरावर डोक्यावर ४, पाठीवर ४, कपाळावर १, छातीवर १ आणि डोक्याच्या मागे २ अशा एकूण १२ गोळ्या लागल्या होत्या. यामुळे पोलिसांना देखील हे पाहून धक्का बसला.
आरोपींचं थरकाप आणि नंतरचं आत्मसमर्पण
हत्यानंतर मुख्य आरोपी नीलेश अनिल सोनवणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे दुचाकीवरून जळगावच्या दिशेने पळाले. मात्र पाठलाग होतोय, किंवा जीवाला धोका आहे, अशी शंका आल्याने त्यांनी थेट जामनेर पोलिस ठाण्याबाहेर येऊन आत्मसमर्पण केलं. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अत्यंत घाबरलेले होते आणि पोलिस स्टेशन कुठे आहे, अशी विचारणा करत उभे होते.
वाळू व्यवसाय की वैयक्तिक वाद?
या घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सोशल मीडियावरील स्टेटस, रील्स आणि व्यक्तिगत वर्चस्वाचा संघर्ष यांचीही सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल डिटेल्स आणि सोशल मीडिया पोस्ट यांचा तपास सुरू असून, लवकरच या घटनेच्या मागील खरी कारणे समोर येण्याची शक्यता आहे.
चुलत्यानेच अपहरण करत केली हत्या
गेल्या काही दिवसांपूर्वीच जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाला हादरवणारी घटना उघडकीस आली. कुंभार पिंपळगाव परिसरात पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयातून चुलत भावानेच एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली. मृत तरुणाचा मृतदेह तब्बल २९ जून रोजी विदर्भातील किनगावराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडेगाव टाकरखेडा परिसरात आढळून आला.प्राथमिक तपासानुसार, सुरेश हा वाळू तस्करीबाबत पोलिसांना माहिती पुरवतो, असा आरोप करून या तिघांनी त्याचे अपहरण करत हत्या केल्याची बाब समोर आली होती.