अमेरिकेतील कॅन्ससमध्ये राहणाऱ्या मॅथ्यू हे या ५४ वर्षीय व्यक्तीने ५ फूट ३ इंच लांबीच्या दाढीसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. त्यांनी जुना विक्रम जवळपास दोन फुटांनी मोडला आहे.
मुंबई : अमेरिकेतील ५४ वर्षीय मॅथ्यू हे यांनी एक अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जिवंत व्यक्तीच्या सर्वात लांब नैसर्गिक दाढीच्या (नॅचरल बियर्ड लॉक) श्रेणीत त्यांनी हा विक्रम रचला असून, त्यांची दाढी तब्बल पाच फुटांपेक्षा जास्त लांब आहे.
कॅन्ससमधील बाल्डविन सिटीमध्ये राहणाऱ्या मॅथ्यू यांच्या दाढीची लांबी ५ फूट ३ इंच (१.६०३ मीटर) इतकी भरली. याआधी हा विक्रम रुडॉल्फ मार्टिनो यांच्या नावावर होता. त्यांची दाढी ३ फूट ६ इंच लांब होती. मॅथ्यू यांनी हा जुना विक्रम सहज मोडला आहे.
मॅथ्यू यांचा हा विक्रम 'नॅचरल बियर्ड लॉक' या विशिष्ट श्रेणीत येतो. जिवंत व्यक्तीची सर्वात लांब दाढी असण्याचा विक्रम यापेक्षा वेगळा आहे. तो विक्रम कॅनडाच्या सरवन सिंग यांच्या नावावर आहे, ज्यांच्या दाढीची लांबी ८ फूट ३ इंच मोजली गेली होती.
मॅथ्यू गेल्या २० वर्षांपासून आपली दाढी वाढवत आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार, ते आधी दाढी छोटीच ठेवायचे. पण काही लहान मुलांनी त्यांना दाढीची वेणी घालण्याची विनंती केली आणि तेव्हापासून त्यांनी दाढी वाढवायला सुरुवात केली. त्यांना तो लूक खूप आवडला. वेळेनुसार त्या वेणीचा नैसर्गिकरित्या एकच लांब झुपका (लॉक) तयार झाला. त्यांची दाढी दरवर्षी साधारण ३ ते ४ इंचांनी वाढते. आता ती इतकी लांब झाली आहे की ते एखाद्या बेल्टसारखी ती आपल्या कमरेभोवती गुंडाळू शकतात.
दाढी एवढी लांब असली तरी ती आपली ओळख नसल्याचे मॅथ्यू सांगतात. एका किशोरवयीन मुलीने त्यांना विचारले होते की, या दाढीमुळे तुमची ओळख निर्माण झाली आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी काहीतरी वेगळे केले म्हणून ही दाढी वाढलेली नाही, तर मी केस कापणे थांबवले म्हणून ती वाढली आहे.
मिसुरीमधील इंडिपेंडन्स शहरात जेव्हा या विक्रमाची अधिकृत नोंद झाली, तेव्हा एका मोठ्या लाकडी फळीवर त्यांची दाढी पसरवून मोजण्यात आली. या मोजमापात त्यांनी जुन्या विक्रमापेक्षा जवळपास दोन फूट जास्त लांबी नोंदवली.
हा विश्वविक्रम नावावर झाल्यानंतरही मॅथ्यू दाढी कापण्याच्या विचारात नाहीत. त्यांनी मजेत सांगितले की, भविष्यात कधीतरी दाढी कापलीच, तर या विश्वविक्रमी दाढीची किंमत काय असेल आणि तिचा विमा उतरवता येईल का, याचा ते विचार करतात. सध्या तरी दाढी कापण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
त्यांच्या दाढीची निगा राखण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ते फक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरतात आणि दाढीला कात्री लावत नाहीत.
दाढीच्या लांबीमुळे त्यांना काही व्यावहारिक अडचणी नक्कीच येतात. दाढी मोकळी सोडली तर ती जमिनीला घासते. त्यामुळे रोजची कामे सोपी व्हावीत म्हणून ते दाढी दुमडून बांधून ठेवतात.
गिनीजने नमूद केले आहे की, मॅथ्यू यांना त्यांच्या लूकव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची आवड आहे. त्यांना कार आणि कॉम्प्युटरची खूप क्रेझ आहे. विशेषतः माझदा आरएक्स-७ (Mazda RX-7) स्पोर्ट्स कार आणि अमिगा (Amiga) कॉम्प्युटर त्यांना खूप आवडतात. याशिवाय वेटलिफ्टिंग, व्हिडिओ गेम्स आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे त्यांना पसंत आहे. त्यांचे मित्र त्यांना दाढीपेक्षा या छंदांमुळे जास्त ओळखतात.
अनोळखी लोक सहसा त्यांच्या दाढीचे कौतुक करतात किंवा ती खरी आहे का, असे विचारतात. पण काही लोक त्यांच्या लूकवरून त्यांना जजही करतात. मॅथ्यू म्हणतात की, हा मुद्दा फक्त दाढी वाढवण्याचा नाही, तर वेगळ्या दिसणाऱ्या लोकांना स्वीकारण्याचा आहे. माणसाचे रूप कसेही असले तरी लोकांनी एकमेकांशी दयाळूपणे आणि समजुतीने वागले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.






