Shubhanshu Shukla Emotional Note for Wife : ॲक्सिऑम-४ मोहिमेपूर्वी शुभांशू शुक्ला यांनी पत्नीला लिहिलेल्या भावनिक ओळींचा जगभर गौरव. ४१ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर.
Shubhanshu Shukla Emotional Tribute Before Axiom-4 Launch : भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या ‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेपूर्वी भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या काही भावनिक ओळी आज संपूर्ण जगाच्या मनाला स्पर्शून गेल्या. २५ जून रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने यशस्वी झेप घेतली आणि त्या आधीचा त्यांचा ‘भावनांचा उड्डाणमग्न क्षण’ आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
“तू नसतीस तर या कशालाच किंमत नव्हती”, पत्नीसाठी खास संदेश
अंतराळ मोहिमेपूर्वी आपल्या पत्नी कामना शुक्ला यांच्यासाठी लिहिलेल्या संदेशात शुभांशू म्हणतात. “आयुष्याच्या प्रवासातील माझी अद्भुत भागीदार असलेल्या कामनाचे विशेष आभार. तुझ्याशिवाय हे काहीच शक्य नव्हतं आणि तू नसतीस तर या कशालाच किंमत नव्हती. आम्ही कोणताही अंतराळ प्रवास एकटे करत नाही, अनेकांच्या प्रेमावर आणि आधारावर ही झेप शक्य होते. मी प्रत्येकाचा आभारी आहे.” त्यांनी पुढे नम्रपणे मान्य केलं की, “कधीकधी आपले प्रियजन आपल्यासाठी जे त्याग करतात, त्याची आपल्याला कल्पना देखील नसते. पण त्यांच्या निःस्वार्थ प्रेमामुळेच आपण मोठं स्वप्न पाहू शकतो आणि ते साकार करू शकतो.”
शुभांशू शुक्ला यांची ऐतिहासिक झेप
२५ जून २०२५ रोजी, शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या फॉल्कन-९ रॉकेटद्वारे ‘ॲक्सिऑम-४’ अंतराळ मोहिमेअंतर्गत पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेप घेतली. या मोहिमेत त्यांच्या बरोबर आणखी तीन अनुभवी अंतराळवीर आहेत, जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे प्रवास करत आहेत. भारताच्या अंतराळ इतिहासात ही झेप विशेष महत्त्वाची आहे कारण ४१ वर्षांनंतर पुन्हा एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय पातळीवर अवकाशात पोहोचला आहे.
१९८४ नंतर पुन्हा एक भारतीय अंतराळात
१९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या मदतीने अंतराळ प्रवास केला होता. त्यानंतर तब्बल चार दशके भारताने अंतराळात थेट सहभाग घेत नव्हता. आता शुभांशू शुक्लांनी ती परंपरा पुन्हा सुरू केली आहे. लखनौचे रहिवासी असलेले शुभांशू वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत असून, कठोर प्रशिक्षण आणि अथक प्रयत्नांमुळे त्यांची ‘ॲक्सिऑम-४’ साठी निवड झाली.
फोटोने वेधलं जगाचं लक्ष
शुभांशू शुक्लांनी पत्नी कामनासोबत उड्डाणपूर्वी शेअर केलेला फोटो आणि त्यावरच्या त्या काही ओळींनी सोशल मीडियावर खळबळ उडवली. केवळ विज्ञान, अंतराळ किंवा यश नव्हे, तर त्या मागचं प्रेम, त्याग आणि मानवी भावना या झोतात आल्या.
प्रेरणा देणारा प्रवास…
शुभांशू शुक्लांचा हा प्रवास केवळ अंतराळात झेप घेण्याचा नाही, तर आपल्या स्वप्नांवर श्रद्धा ठेवून, प्रियजनांच्या पाठिंब्याने कितीही उंच भरारी घेता येते, याचा जिवंत पुरावा आहे. त्यांचे शब्द आणि त्यांच्या जोडीदाराचे मूक सहकार्य, हे दोघांचेही भारतीय तरुणांसाठी आज मोठं प्रेरणास्त्रोत ठरले आहे.