अमेरिकेने दहशतवाद, अपहरण, नागरी अशांततेमुळे आपल्या नागरिकांसाठी पाकिस्तान प्रवासाबाबत नवी नियमावली जारी केली. पाकिस्तानला लेव्हल ३ चा इशारा दिला असून, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा सारख्या भागांत लेव्हल ४ म्हणजेच अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला.

US Travel Advisory for Pakistan: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी पाकिस्तान प्रवासाचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी पाकिस्तान प्रवासाबाबत कडक शब्दांत नवी नियमावली (Travel Advisory) जारी केली आहे. पाकिस्तानातील वाढता दहशतवाद, अपहरण आणि नागरी अशांतता पाहता, अमेरिकेने हा इशारा दिला आहे.

प्रवासाचा फेरविचार करा: 'लेव्हल ३' चा इशारा

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (State Department) पाकिस्तानला 'लेव्हल ३' (Level 3) श्रेणीमध्ये ठेवले आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानला जाण्याचा गांभीर्याने फेरविचार करावा. पाकिस्तानात कधीही आणि कोठेही दहशतवादी हल्ले होऊ शकतात, असा स्पष्ट इशारा यात देण्यात आला आहे.

दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य

रेल्वे स्थानके आणि विमानतळ

मोठी हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स

शाळा, रुग्णालये आणि प्रार्थना स्थळे

सरकारी इमारती आणि लष्करी तळ

'या' भागांत तर अजिबात जाऊ नका; 'लेव्हल ४' लागू!

पाकिस्तानातील काही भाग तर इतके धोकादायक आहेत की, अमेरिकेने तिथे 'लेव्हल ४: अजिबात प्रवास करू नका' असा इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांचा समावेश आहे. या भागात केवळ दहशतवादच नाही, तर मारुन टाकणे आणि अपहरणाचे प्रमाणही अत्यंत जास्त आहे. विशेष म्हणजे हा नियम केवळ पर्यटकांसाठीच नाही, तर मूळचे पाकिस्तानी असलेल्या अमेरिकन नागरिकांसाठीही लागू असेल.

सोशल मीडिया पोस्टमुळे होऊ शकते जेल!

अमेरिकेने आपल्या नागरिकांना आणखी एका गोष्टीबाबत सावध केले आहे. पाकिस्तानात स्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते. १. आंदोलने: परवानगीशिवाय कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्यास अटकेची भीती आहे. २. सोशल मीडिया: जर तुम्ही सोशल मीडियावर पाकिस्तान सरकार, तिथले लष्कर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका करणारी पोस्ट टाकली, तरीही तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

अमेरिकेचे 'ट्रॅव्हल लेव्हल्स' नक्की काय आहेत?

अमेरिका जगातील देशांना सुरक्षेनुसार चार स्तरांमध्ये विभागते.

लेव्हल १ (सामान्य खबरदारी): सर्वात सुरक्षित, फक्त सामान्य काळजी घ्या.

लेव्हल २ (वाढीव खबरदारी): सुरक्षेच्या दृष्टीने काहीसे संवेदनशील भाग.

लेव्हल ३ (प्रवासाचा फेरविचार करा): गंभीर सुरक्षा धोके असल्याने प्रवास टाळलेला बरा.

लेव्हल ४ (अजिबात प्रवास करू नका): सर्वात धोकादायक श्रेणी. येथे आणीबाणीच्या काळात अमेरिकन सरकारही मदत करू शकणार नाही, अशी परिस्थिती असते.

थोडक्यात सांगायचे तर पाकिस्तानातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था पाहता, अमेरिकेने आपल्या नागरिकांना तिथून लांब राहण्याचाच सल्ला दिला आहे.