सार

Cancer Vaccine : UK सरकारने मागील वर्षी वैयक्तिकृत स्वरुपात कर्करोगावरील उपचार प्रदान करण्यासाठी जर्मनीतील बायोएनटेकशी करार केला होता. वर्ष 2030पर्यंत 10 हजार कॅन्सर रुग्णांना चांगले उपचार देणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

Cancer Vaccine : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कॅन्सर आजारावरील लसीसंदर्भात बुधवारी (14 फेब्रुवारी) मोठी माहिती दिली आहे. "रशियन शास्त्रज्ञ कॅन्सर आजारावरील लस तयार करण्याच्या प्रक्रियेच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. ही लस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते", अशी माहिती पुतिन यांनी दिली.

एका कार्यक्रमामध्ये बोलताना पुतिन यांनी म्हटले की, "मला आशा आहे की लवकरच वैयक्तिकृत उपचार पद्धती म्हणून प्रभावीपणे हे वापरात येईल. पण प्रस्तावित लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगाच्या औषधोपचारांकरिता तयार करण्यात येत आहेत किंवा ही लस कशा पद्धतीने कार्य करेल, याची माहिती पुतीन यांनी स्पष्ट केलेली नाही. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून अनेक देश आणि जगप्रसिद्ध औषधांच्या कंपन्या कर्करोगाच्या लसीवर काम करत आहेत.

कॅन्सर आजाराशी संबंधित काम आहे सुरू

मागील वर्षी UK सरकारने वैयक्तिकृत कॅन्सर आजारावरील उपचार प्रदान करण्यासाठी जर्मनीतील बायोएनटेकशी करार केला होता. वर्ष 2030पर्यंत 10 हजार कॅन्सर रुग्णांना उत्तम उपचार उपलब्ध करून देणे हे यामागील उद्दिष्ट आहे. फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्ना (Moderna) आणि मर्क अँड कंपनी (Merck & Co) प्रायोगिक कॅन्सरची लस विकसित करत आहेत, याबाबतच्या संशोधनातील समोर आलेल्या माहितीनुसार मेलेनोमा - या सर्वाधिक गंभीर स्वरुपातील त्वचेच्या कॅन्सरमुळे आजाराची पुनरावृत्ती किंवा मृत्यूची धोका तीन वर्षांच्या उपचारानंतर निम्मा होईल, असे म्हटले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी

जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) वरील औषधोपचारांमध्ये सहा परवानाकृत लसी उपलब्ध आहेत, ज्याचा उपयोग गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह अनेक कर्करोगांवरील उपचारांमध्येही केला जातो. यासह हेपेटायटीस बी (एचबीव्ही) औषधोपचारांवरील लस देखील उपलब्ध आहेत, जे यकृताचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करतात. रशियाने कोरोना व्हायरस महामारीदरम्यान स्वतः स्पुटनिक- V लस विकसित केली आणि त्याचा अनेक देशांना पुरवठा देखील केला. 

त्यामुळे आता तयार होत असलेली कर्करोगावरील लस कशा पद्धतीने प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा :

Breast Cancer : या सोप्या पद्धतीने होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, वेदनादायक तपासण्यांपासून आता सुटका

अमेरिकेत आढळला Bubonic प्लेगचा रुग्ण, एकेकाळी या महामारीमुळे 50 दशलक्ष लोकांचा गेलाय बळी

RRB Technician Recruitment 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशिअन पदासाठी 9 हजार रिक्त जागांवर होणार भरती, इतका मिळणार पगार