सार
Bubonic Plague News : ब्युबोनिक प्लेग आजाराच्या साथीने एकेकाळी युरोपमधील किमान एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी गेला होता. या महामारीस ‘ब्लॅक डेथ’ असेही म्हटले जाते.
Bubonic Plague News : ब्युबोनिक प्लेगचा (Bubonic Plague) रुग्ण आढळल्यानंतर अमेरिकेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारामुळे कोणे एकेकाळी युरोपमधील एक तृतीयांश नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. नुकतेच याच आजाराची लक्षणे अमेरिकेतील एका नागरिकामध्ये आढळल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील ओरेगॉन येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने एका स्थानिक रहिवाशामध्ये ब्युबोनिक प्लेगची (Bubonic Plague case) लक्षणे आढळल्याचे सांगितले आहे. तर या आजाराची लागण पाळलेल्या मांजरीपासून झाली असावी, असे रुग्णाचे म्हणणे आहे.
Deschutes Countyचे आरोग्य अधिकारी डॉ. रिचर्ड फॉसेट यांनी मागील आठवड्यामध्ये जारी करण्यात आलेल्या निवदेनात म्हटले होते की, “रुग्ण आणि मांजराच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांशी ओळख पटवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची प्राथमिक टप्प्यातच ओळख पटवण्यात आली आणि त्यावर उपचारही करण्यात आल्याने यामुळे हा आजार पसरण्याचा कोणताही धोका नाही”.
ब्युबोनिक प्लेग आजाराची लक्षणे
- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर आठ दिवसांनंतर माणसांमध्ये प्लेगची लक्षणे आढळू लागतात.
- ताप येणे, मळमळणे, अशक्तपणा जाणवणे, थंडी लागणे आणि शरीराचे स्नायू दुखणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळतात.
- तातडीने उपचार न केल्यास ब्युबोनिक प्लेग आजार सेप्टिकेमिक प्लेग, रक्तप्रवाहाचा संसर्ग किंवा न्युमोनिक प्लेग अशा स्वरुपातील आजारांमध्ये वाढू शकतो.
- याचे परिणाम फुफ्फुसावर होतात. या दोन्ही बाबी अतिशय गंभीर असू शकतात.
आजाराचा कोणताही धोका नाही
अमेरिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णामधील आजाराची लक्षणे योग्य वेळीच ओळखली गेली आहेत. रुग्णावर उपचारही करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा आजार अधिक प्रमाणात पसरण्याची शक्यता नाही. संसर्गजन्य आजाराच्या तपासणीदरम्यान प्लेगची कोणतीही अन्य प्रकरणे समोर आलेली नाहीत.
चौदाव्या शतकामध्ये पसरली होती महामारी
चौदाव्या शतकामध्ये या जीवघेण्या आजारामुळे तब्बल 50 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी गेला होता. विविध उपाययोजना राबवून या आजाराची साथ नियंत्रणात आणली गेली. यानंतर वर्ष 2015मध्ये अमेरिकेत पुन्हा या आजाराचे प्रकरण आढळले होते. त्यावेळेसही संसर्ग वाढू नये, यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना राबवण्यात आल्या.
काय घ्यावी खबरदारी?
ज्या लोकांच्या घरामध्ये पाळीव प्राणी आहेत किंवा जे मांसाहारी आहेत, त्यांनी या आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता स्वच्छतेची अधिकाधिक काळजी घ्यावी. घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी लसीकरण करावे. त्यांच्याही स्वच्छतेची काळजी घ्यावी.
आणखी वाचा
PF Interest Rate : नोकरदारांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता PF खात्यावर मिळणार इतके टक्के व्याज